( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
कोकण तसेच तळकोकणात महायुतीतील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर आला असून नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या जागावाटपावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील मतभेद तीव्र झाले आहेत. सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप, रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी तर रत्नागिरी जिल्ह्यात आता महायुतीतीलच वाद चिघळला आहे.
रत्नागिरीत आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेनेनं अचानक गाठीभेटीत राष्ट्रवादीला डावलत स्वतंत्र सूत्र हाती घेतलं. महायुतीच्या एकाही बैठकीस राष्ट्रवादीचे प्रतिनिधी न बोलावल्याने, पक्षाच्या स्थानिक नेतृत्वात संताप उसळला होता. याच वातावरणात भाजप–शिवसेना युती जुळल्याची माहिती समोर आली आणि पुढे शिवसेनेनं दमदार शक्तिप्रदर्शनात माधवी बुटाला यांच्या उमेदवारी अर्जाचा थाटात दाखल केला. परिणामी महायुतीतील ‘खदखद’ उघडपणे व्यक्त होऊ लागली. परंतु या प्रकरणाला पूर्ण दिवसही उलटत नाही तोच खेड नगरपरिषद जागावाटपावरून भाजपमध्येच बंडाची ठिणगी पडली. नगरपरिषदेत २० जागांपैकी तब्बल १७ जागा शिवसेनेच्या तर फक्त ३ जागा भाजपच्या वाट्याला दिल्यानं, भाजपचे माजी आमदार सुर्यकांत दळवी, जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्यासह ३९ पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनाम्याची धमकी देत पक्षनेतृत्वाला अल्टिमेटम दिला आहे.
खेड नगरपरिषद ‘स्वबळावर जिंकण्याची’ क्षमता असताना फक्त तीन जागा देणं अन्यायकारक असल्याचा आरोप करत दळवी आणि साठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार नितेश राणे यांना तक्रारपत्र पाठवले आहे. जागावाटपात शिवसेना आमदार योगेश कदम यांनी भाजपला मुद्दाम डावलल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पदाधिकाऱ्यांच्या पत्रात “मंत्री योगेश कदम मीडिया समोर सातत्याने भाजप नेत्यांचा अवमान करत आहेत”, असा गंभीर आरोप नोंदवण्यात आला आहे. तसेच या जागावाटपामुळे “पक्षाचे स्थानिक अस्तित्वच धोक्यात येईल”, असा इशाराही यात देण्यात आला आहे.
याहूनही तीव्र तक्रार म्हणजे, गावागावात शिवसेनेचे कार्यकर्ते “सत्ता तुमची, आणि भांडी घासा आमची” अशा शब्दांत भाजप पदाधिकाऱ्यांची अवहेलना करत असल्याची नोंदही पत्रात करण्यात आली आहे. सर्व निर्णय ‘विश्वासात न घेता’ घेतल्याची भावना पक्षात खोलवर रूजली असून त्यामुळे नाराजी अधिकच फोफावत आहे. पदाधिकाऱ्यांनी कदम यांच्या माध्यमातील वक्तव्यांवर लगाम आणण्याची, तसेच जागावाटपाचा पुनर्विचार करून न्याय्य आणि सन्मानजनक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चव्हाण, मंत्री बावनकुळे आणि नितेश राणे यावर काय भूमिका घेतात, तसेच उदय सामंत आणि योगेश कदम यांची प्रतिक्रिया काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

