(चिपळूण / रत्नागिरी)
दुकानात माल भरण्यासाठी आईकडून २५ हजार रुपये आणण्यास सांगितले असता त्यास नकार दिल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना सावर्डे कासारवाडी येथे घडल्याचा आरोप आहे. यावेळी संबंधित महिलेला ‘तुला मारून टाकेन, पेट्रोल टाकून जाळून टाकेन’, अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पल्लवी उभयचंद मोहिरे (वय ३५, रा. सावर्डे कासारवाडी, ता. चिपळूण) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १५ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास संबंधित आरोपीने दुकानामध्ये माल भरण्यासाठी त्यांच्या आईकडून २५ हजार रुपये आणण्यास सांगितले. मात्र, पल्लवी यांनी पैसे आणण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच ‘पेट्रोल टाकून जाळून टाकेन’, अशी धमकी देत त्यांच्या दोन्ही कानाखाली हाताने मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर डोक्यावर हाताच्या ठोशांनी मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. एवढ्यावर न थांबता लाकडी दांडक्याने डाव्या कुशीवर तसेच उजव्या पायाच्या ढोपरावर मारहाण केल्याने पल्लवी मोहिरे जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उभयचंद आत्माराम मोहिरे (वय ३८, रा. सावर्डे कासारवाडी, ता. चिपळूण) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सावर्डे पोलिस करीत आहेत.


