(रत्नागिरी/ राजापूर)
घराच्या अंगणात उभ्या असलेल्या महिलेकडे पाहून ‘माझ्याकडे काय बघतेस?’ असा जाब विचारत शिवीगाळ केल्यानंतर झालेल्या वादातून एका महिलेच्या डोक्यात काठीने वार करण्यात आल्याची घटना राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गुरववाडी येथे घडली. या मारहाणीत सुप्रिया सुधाकर गुरव (४५) जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी शुभ्रा सुशांत गुरव (३५) हिच्याविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सुप्रिया गुरव या आपल्या घराच्या अंगणात मशेरी लावत उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या शुभ्रा गुरव हिने त्यांच्याकडे पाहून ‘माझ्याकडे काय बघतेस?’ असे म्हणत शिवीगाळ केली. याबाबत जाब विचारण्यासाठी सुप्रिया या शुभ्रा हिच्या घरासमोर गेल्या. ‘मला शिवी का दिलीस, मी तुझे काय केले?’ अशी विचारणा त्यांनी केली. यावेळी शुभ्रा हिने पुन्हा शिवीगाळ करत आपल्या अंगणात असलेली काठी उचलली आणि सुप्रिया यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या झटापटीत काठीचा फटका त्यांच्या उजव्या हाताच्या पंजालाही बसला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली.
या प्रकरणी सुप्रिया गुरव यांच्या तक्रारीवरून शुभ्रा गुरव हिच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ११८(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.


