(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल येथील सद्गुरू गॅस सेवा केंद्राविरोधात काही महिन्यांपूर्वी प्राप्त तक्रारींच्या आधारे पुरवठा विभागाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले होते. या कारवाईत रिकामे गॅस सिलिंडर तसेच सुमारे ११०० ग्राहकांची गॅस कार्डे जप्त करण्यात आली असून संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
मात्र, या कारवाईनंतर सामान्य गॅस ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस कार्डे उपलब्ध नसल्याने ग्राहकांना बुकिंग करता येत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अनेक कुटुंबांना घरगुती गॅस पुरवठ्यात अडथळे येत असून त्यातून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर युवासेना तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार राजापूर यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, मात्र निष्पाप ग्राहकांना वेठीस धरू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जप्त करण्यात आलेली सर्व गॅस कार्डे तात्काळ संबंधित ग्राहकांना परत करण्यात यावीत, अशी ठाम मागणी युवासेनेने केली आहे. या वेळी युवासेना तालुका प्रमुख सुनील गुरव, पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, तालुका संघटक गणेश पाष्टे, शहर प्रमुख प्रजोत खडपे, युवराज मोरे, राहुल गोसावी, सुमित गुरव आदी उपस्थित होते.

