(राजापूर)
कोल्हापूरच्या शाहूवाडी येथे एका जोडप्याचा खून करणाऱ्या संशयित आरोपीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीविरुद्ध मोटारसायकल चोरी, घरफोडी, महिलांची छेडछाड, मारामारी यांसारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र, या आरोपीचा राजापूरातील वैशाली शेट्ये खून प्रकरणाशी सध्यातरी कोणताही संबंध आढळलेला नाही, अशी माहिती राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी दिली आहे.
पोलिस निरीक्षक यादव म्हणाले, “वैशाली शेट्ये यांच्या खुनाचा तपास सुरू आहे. कोल्हापूर येथे अटक झालेल्या आरोपीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? याची शक्यता तपासली जात आहे. काही धागेदोरे आमच्या तपासात आले आहेत आणि पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास योग्य दिशेने सुरू आहे. आरोपीला लवकरच गाठले जाईल आणि ताब्यात घेतल्यानंतर अधिकृत माहिती माध्यमांना दिली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एका वृत्तपत्राने या आरोपीचा राजापूरातील खून प्रकरणाशी संबंध जोडत बातमी प्रसिद्ध केली आहे. मात्र, या वृत्ताचे पोलिस निरीक्षक यादव यांनी खंडन केले आहे.
ते म्हणाले, “अधिकृत माहिती मिळेपर्यंत कोणतीही अप्रमाणित बातमी प्रसारित करू नये. तपास सुरू असून योग्य वेळी संपूर्ण माहिती दिली जाईल. नागरिकांनी आणि माध्यमांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहनही त्यांनी केले.

