(सिंधुदुर्ग)
कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा महत्वाकांक्षी वैभववाडी–कोल्हापूर नवा रेल्वे मार्ग लवकरच मार्गी लागणार आहे. या प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली असून, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गामुळे कोकणातील प्रवाशांसह औद्योगिक क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे.
नितेश राणेंची रेल्वेमंत्र्यांशी बैठक
मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या वेळी कोकणातील रेल्वेसंबंधी अनेक प्रलंबित मागण्या त्यांनी मांडल्या. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ते सहकार्य आणि तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गाचा फायदा
या नव्या रेल्वे मार्गामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील संपर्क सुलभ होणार आहे. प्रवासाची सोय वाढण्यासोबतच मत्स्य उद्योग, आयात-निर्यात (इम्पोर्ट-एक्स्पोर्ट) आणि औद्योगिक क्षेत्रालाही नवी चालना मिळेल. जलमार्ग व रेल्वे या दोन्ही मार्गांचा एकत्रित उपयोग होऊन कोकणातील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वेमार्गामुळे इतर उद्योगांव्यतिरिक्त या भागातील विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी औष्णिक कोळशाच्या वाहतुकीला मदत मिळणार असून या भागातील पर्यटन आकर्षणाव्यतिरिक्त उद्योगांचे नव्या पायाभूत सुविधांच्या कनेक्टिव्हिटी संदर्भात मूल्यमापन करण्यात आले. या रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादित शेतीमाल बंदरापर्यंत पोहोचण्यास तर कोकणातील खनिजासह अन्य मालाची पश्चिम महाराष्ट्रात वाहतूक करणे सुलभ आणि किफायतशीर होऊन कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल.
सध्या पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. तर कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. तर कोकणातील मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या मागण्या
नितेश राणे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे कोकणातील विविध सोयीसुविधांसाठीही मागण्या केल्या. त्यात –
- सिंधुदुर्ग व परिसरातील महत्त्वाच्या स्थानकांवर १६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे,
- कोइंबतूर, नागरकोईल व मडगाव एक्सप्रेसना कणकवली येथे थांबा,
- मांडवी एक्सप्रेसला नांदगाव थांबा,
- मडूरे व सावंतवाडी येथून विशेष गाड्या,
- स्थानकांवर पीआरएस काउंटर व प्रवासी सुविधा उन्नतीकरण,
- तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ,
- स्थानकांचे आधुनिकीकरण,
यांसारख्या मागण्यांचा समावेश होता.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या सर्व मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवत आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कोकण विशेषतः सिंधुदुर्गवासीयांच्या अनेक वर्षांच्या मागण्या आता प्रत्यक्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

