(रत्नागिरी / वार्ताहर)
संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांच्यामार्फत मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्रसंहितेबाबत महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात यासंदर्भातील सूचना फलक प्रदर्शित करण्यात आले असून, दिनांक १ जानेवारी २०२७ पासून वस्त्रसंहिता (Dress Code) नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे संस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
श्रींच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करताना चित्रात दाखविल्याप्रमाणे विनम्र व सुसंस्कृत कपडे परिधान करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांनी मंदिराच्या पवित्र वातावरणाचा विचार करून योग्य व सभ्य वेशभूषेचा अवलंब करावा, अशी विनंती संस्थानकडून करण्यात आली आहे.
वस्त्रसंहितेनुसार कमी कपड्यांतील टी-शर्ट, हाफ पँट, शॉर्ट्स आदी किंवा पवित्र स्थानी जाण्यासाठी अयोग्य अशा वेशभूषेत मंदिरात प्रवेश देता येणार नाही. तसेच गुडघ्यांच्या वर येणारे स्कर्ट्स किंवा ड्रेसेस परिधान करून येऊ नये. अश्लील भाषा किंवा आक्षेपार्ह चित्र असलेले कपडेही टाळावेत, असे सूचनेत नमूद करण्यात आले आहे.
अशा कपड्यांतील मंडळींना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश निषिद्ध असेल व त्याकरिता आम्हाला भीड घालू नये, असेही संस्थानने स्पष्ट केले आहे. मात्र, १० वर्षांआतील मुलांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.
श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी वस्त्रसंहितेची नोंद घेऊन मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांच्या पंचकमिटीतर्फे करण्यात आले आहे.


