(रत्नागिरी)
तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठेत रस्ता ओलांडणाऱ्या प्रौढ व्यक्तीस भरधाव दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवार, ३ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडला.
या दुर्घटनेत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव शिवाजी गोविंद कुळ्ये (वय ५०, रा. तरवळ, कुळ्येवाडी, रत्नागिरी) असे आहे.
याबाबत मृताच्या मुलगा सुमित कुळ्ये यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, बुधवारी शिवाजी कुळ्ये हे जाकादेवी बाजारपेठेत रिक्षा स्टँडकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना श्रीराज प्रसाद सावंत (वय २३, रा. मांजरे देसाईवाडी, संगमेश्वर) याच्या ताब्यातील एमएच-०८-एल-२७७९ क्रमांकाची दुचाकी वेगाने येऊन त्यांनी धडक दिली.
धडकेत शिवाजी कुळ्ये रस्त्यावर खाली पडून गंभीर जखमी झाले. तेथील नागरिकांनी त्यांना तात्काळ जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे हलविण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

