(रत्नागिरी / वार्ताहर)
वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी आलेल्या तापानंतर डाव्या पायाला पोलिओ झाला आणि चालता येणे बंद झाले. उपचारासाठी आईसोबत बेळगाव गाठावे लागले; मात्र पूर्वीसारखे चालणे शक्य झाले नाही. तरीही या शारीरिक अडचणीसमोर हार न मानता शिक्षणाची वाट धरत आत्मविश्वासाने आयुष्याची वाटचाल करणाऱ्या तुळसणी (ता. संगमेश्वर) येथील शाकीरा मोहम्मद कुरेशी (वय ४५) यांच्या जीवनात १६ सप्टेंबर २०२६ रोजी नव्या पर्वाची सुरुवात झाली. उद्यमनगर, रत्नागिरी येथे त्यांचा मुंब्रा, मुंबई येथील टेलरिंग व्यवसाय करणारे आणि स्वतःही पोलिओमुळे दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले शमशुद्दीन अन्सारी यांच्याशी विवाह झाला.
शाकीरा यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे वडील मोहम्मद कुरेशी वैद्यकीय व्यवसाय करत होते, तर आई सफिया कुरेशी गृहिणी आहेत. त्यांचे दोन भाऊ आणि दोन बहिणी विवाहित आहेत. शाकीरा चार वर्षांच्या असताना तापानंतर त्यांच्या डाव्या पायाला पोलिओ झाला. त्यामुळे त्यांची चालण्याची क्षमता प्रभावित झाली. उपचारासाठी त्या आईसोबत बेळगाव येथे राहिल्या. उपचार झाले, मात्र पूर्वीसारखे चालणे शक्य झाले नाही. या परिस्थितीने मात्र त्यांच्या जिद्दीला खीळ बसली नाही.
त्यांनी तुळसणी येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला वडील सायकलवरून त्यांना शाळेत सोडत आणि परत घेऊन येत. पुढे शाळेत ने-आण करण्यासाठी एका मुलाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर देवरुख येथे रिक्षाने ये-जा करत त्यांनी अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केले.
वयाच्या १७व्या वर्षी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर कॅलिपरच्या साहाय्याने त्यांनी हळूहळू चालण्यास सुरुवात केली. शारीरिक अडचणी कायम असतानाही त्यांनी पुढील शिक्षण साखरपा येथून पूर्ण केले आणि पदवीपर्यंत मजल मारली.
पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि परीक्षा दिल्या. याच काळात सिंधुदुर्ग येथील स्वप्ननगरीमधील काजू प्रशिक्षण केंद्रात त्यांनी सुमारे सहा महिने नोकरी केली. मात्र वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने नोकरी सोडून त्यांना घरी परतावे लागले. त्यानंतर वडिलांचे निधन झाले. पुढे त्यांनी आईची जबाबदारी स्वीकारत तिची काळजी घेतली.
दरम्यान, एका वृत्तपत्रात आर एच पी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी दिलेली जाहिरात शाकीरा यांच्या वाचनात आली. या जाहिरातीच्या माध्यमातून त्यांची सादिक नाकाडे यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्या आर एच पी फाउंडेशनच्या सभासद झाल्या. संस्थेच्या माध्यमातून त्यांना दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना, सुविधा आणि उपक्रमांची माहिती मिळाली. तसेच आवश्यक ती मदतही मिळाली.
अखेर १६ सप्टेंबर २०२६ हा दिवस शाकीरा यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा ठरला. मुंब्रा, मुंबई येथे टेलरिंग व्यवसाय करणारे आणि स्वतःही पोलिओमुळे दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले शमशुद्दीन अन्सारी यांच्यासोबत त्यांचा उद्यमनगर, रत्नागिरी येथे विवाह झाला. आयुष्यातील संघर्ष जवळून अनुभवलेल्या या दोघांनी आता एकमेकांच्या साथीने नव्या आयुष्याची वाटचाल सुरू केली आहे.
या विवाह सोहळ्याला आर एच पी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, दिव्यांग जनकल्याण संस्था लांजाचे सचिव युसारा पन्हाळेकर आणि सदस्य शगुफ्ता नाईक उपस्थित होते. उपस्थितांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी आनंद, प्रेम, समाधान आणि सुखसमृद्धीच्या शुभेच्छा दिल्या.
पोलिओमुळे त्यांच्या पावलांना अडथळा निर्माण झाला, मात्र स्वप्नांकडे जाणारी त्यांची वाटचाल कधीच थांबली नाही. शिक्षण पूर्ण करत, विविध अडचणींना सामोरे जात आणि आईची जबाबदारी सांभाळत शाकीरा यांनी आपल्या जीवनप्रवासातून जिद्दीचे उदाहरण निर्माण केले. आता शमशुद्दीन यांच्या साथीने त्यांच्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.


