(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गणेश चतुर्थीच्या मंगलमय वातावरणात घराघरांत लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आता भाविकांना ज्येष्ठा गौरीच्या आगमनाचे वेध लागले आहेत. आज गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी घराघरांत गौरीचे आगमन होणार असून, त्यानिमित्त महिलांची लगबग सुरू झाली आहे. गौरीच्या स्वागतासाठी घरांची स्वच्छता, सजावट तसेच नैवेद्याच्या तयारीला वेग आला आहे.
परंपरेनुसार अनुराधा नक्षत्रावर गुरुवारी गौरीचे आवाहन केले जाणार असून ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचे पूजन करण्याची परंपरा आहे. काही कुटुंबांमध्ये ज्येष्ठा गौरी, तर काही ठिकाणी ज्येष्ठा व कनिष्ठा अशा दोन गौरींची प्रतिष्ठापना केली जाते. पाणवठ्यावरून प्रतिकात्मकरीत्या गौरी आणण्याची प्रथा आजही अनेक कुटुंबांत जपली जाते. महिला आणि मुली पारंपरिक पद्धतीने गौरीला घरी आणतात. घराच्या प्रवेशद्वारावर गौरीचे औक्षण करून स्वागत केले जाते. भाकरीचा तुकडा ओवाळून टाकण्याचीही प्रथा काही ठिकाणी आढळते. गौरीला गणेशाची माता पार्वतीचे एक रूप मानले जाते. गौरीच्या आगमनाने घरात आरोग्य, ऐश्वर्य, सुख-समृद्धी आणि भरभराट नांदते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे गौरीच्या स्वागताला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. गणरायाच्या शेजारी गौरीची आकर्षक सजावट करून तिची प्रतिष्ठापना केली जाते.
गौरी आगमनाच्या पहिल्या दिवशी गोडधोडासह भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. गौरीपूजनाच्या दिवशी पंचपक्वान्न, विविध गोड पदार्थ आणि फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. घरातील महिला पारंपरिक वेशभूषेत गौरीपूजनाची तयारी करीत असल्याने गणेशोत्सवातील भक्तिमय वातावरणाला आणखी उत्सवी रंग चढणार आहे.
यंदाचे गौरीचे मुहूर्त
गौरी आवाहन : गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.५२ वाजण्यापूर्वी गौरीचे आवाहन करता येणार आहे.
ज्येष्ठा गौरी पूजन : शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी गौरीचे मुख्य पूजन करण्यात येणार आहे.
गौरी विसर्जन : शनिवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ६.२७ ते सायंकाळी ६.३८ या कालावधीत गौरी विसर्जन करता येणार आहे.


