(राजापूर / तुषार पाचलकर)
गतवर्षीच्या उत्साहपूर्ण आयोजनानंतर पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाच्या वतीने यंदाही दहीहंडी २०२६ या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले. ५१ हजार रुपयांची दहीहंडी हे उत्सवाचे मुख्य आकर्षण असतानाच यंदा प्रथमच रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने उत्सवाला क्रीडा आणि मनोरंजनाची विशेष रंगत लाभली.
५१ हजार रुपयांची दहीहंडी फोडण्यासाठी शिवशक्ती महिला गोविंदा पथक, हनुमान प्रसन्न खडपेवाडी पथक, कालिका देवी गोविंद पथक भू, राजापूर आणि मारुती प्रसन्न आंबेवाडी, राजापूर या पथकांनी जवळपास सहा ते सात थर लावत हंडी फोडली. गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्यासाठी झालेली चुरस उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली.
यंदाच्या उत्सवातील विशेष आकर्षण असलेल्या रस्सीखेच स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग नोंदवला. अपेक्षेपेक्षा अधिक संघ सहभागी झाल्याने स्पर्धेत चांगली रंगत निर्माण झाली. प्रथम क्रमांकासाठी ७ हजार ७७७ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार ५५५ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ३ हजार ३३३ रुपये रोख पारितोषिक ठेवण्यात आले होते.
या चुरशीच्या स्पर्धेत अव्हेंजर्स तळवडे संघाने प्रथम क्रमांक पटकावला. राजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक, सन्मानपत्र आणि ७ हजार ७७७ रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ए वन कृषी सेवा केंद्र-पाचल संघाने द्वितीय, तर पाचल गुरववाडी संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून पाचल पंचक्रोशीतील नागरिकांना एकत्र आणण्यासोबतच युवकांमध्ये उत्साह, एकजूट आणि क्रीडाभावना निर्माण करण्याचा प्रयत्न पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाकडून करण्यात आला. गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्यासाठी रंगलेली चुरस आणि रस्सीखेच स्पर्धेतील थरार यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.

