(राजापूर / प्रतिनिधी)
तालुक्यातील जुवाठी येथील शिर्केवाडी परिसरात बुधवारी सकाळी विहिरीत पडलेल्या एका मादी बिबट्याची वन विभागाने अत्यंत तत्परतेने आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने सुटका केली. या संपूर्ण बचाव मोहिमेने परिसरातील ग्रामस्थांमध्ये काही काळ उत्सुकता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
श्री. रामचंद्र नारायण भारती यांच्या मालकीच्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती सकाळी नऊच्या सुमारास गावचे पोलीस पाटील यांनी वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान सुमारे ३५ ते ४० फूट खोल विहिरीतील एका दगडावर बिबट्या बसून असल्याचे निदर्शनास आले. वन विभागाच्या बचाव पथकाने सकाळी ११.०५ वाजता विशेष पिंजरा दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरविला. अवघ्या चार मिनिटांत, म्हणजेच ११.०९ वाजता, बिबट्या सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. संपूर्ण कारवाई अत्यंत संयमाने आणि दक्षतेने पार पडल्याने बिबट्याला कोणतीही दुखापत झाली नाही.
यानंतर डॉ. वेर्लेकर यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत हा बिबट्या मादी जातीचा असून तिचे वय अंदाजे दीड ते दोन वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. तिची प्रकृती पूर्णतः स्थिर असल्याची खात्री झाल्यानंतर वन विभागाने तिला नैसर्गिक अधिवासात पुन्हा मुक्त केले. ही संपूर्ण मोहीम गिरिजा देसाई, प्रियांका लगड आणि प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार तसेच बचाव पथकातील दीपक चव्हाण, निलेश म्हादये, नितेश गुरव, संदीप जाधव आणि साहील जांगळी यांनी प्रत्यक्ष मोहिमेत सहभाग घेतला. वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास अथवा अशा घटना घडल्यास तात्काळ वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर संपर्क साधावा.

