(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सन २०१८-१९ मध्ये गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्याचे पडसाद यंदाच्या शिक्षक भरती प्रक्रियेतही उमटले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ४७८ शिक्षक पदांच्या भरतीसाठी पवित्र पोर्टलमार्फत अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी १३ जणांचा टीईटी घोटाळ्याशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या १३ उमेदवारांची नावे, टीईटी क्रमांक आणि आधारशी संबंधित तपशील पडताळणीसाठी पुणे सायबर क्राईम विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. सायबर विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच संबंधित उमेदवारांना नियुक्ती द्यायची अथवा भरती प्रक्रियेतून वगळायचे, याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याने या प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या ४७८ शिक्षक पदांसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात आली. तीन टप्प्यांत कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली असून, त्यामध्ये ४५७ उमेदवार उपस्थित राहिले, तर २१ उमेदवार गैरहजर राहिले. कागदपत्र पडताळणी पूर्ण होऊनही अद्याप समुपदेशनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यातच पडताळणी झालेल्या उमेदवारांपैकी १३ जणांचा टीईटी घोटाळ्याशी संबंध असल्याची माहिती समोर आल्याने भरती प्रक्रियेला आणखी एक वळण मिळाले आहे. मात्र हे १३ उमेदवार पडताळणीसाठी उपस्थित राहिलेल्या ४५७ जणांमध्ये आहेत की गैरहजर राहिलेल्या २१ उमेदवारांमध्ये, याबाबतची स्थिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. संबंधित उमेदवारांच्या तपशीलाची सायबर क्राईम विभागाकडून पडताळणी केली जात आहे. त्यामुळे सायबरच्या अहवालानंतरच या उमेदवारांबाबत पुढील कार्यवाही निश्चित होणार आहे.
यापूर्वी जून २०२४ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात १,०१६ उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. त्या भरती प्रक्रियेत २६ उमेदवार गैरहजर राहिले होते. त्यावेळीही टीईटी घोटाळ्याशी संबंधित उमेदवारांचा मुद्दा चर्चेत आला होता. रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक पदासाठी आलेल्या नऊ उमेदवारांचा टीईटी घोटाळ्याशी संबंध असल्याचे पुणे पोलिसांच्या अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. हे उमेदवार परजिल्ह्यातील असल्याचे त्यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. टीईटी घोटाळ्याशी संबंधित उमेदवारांच्या बाबतीत पुणे सायबर क्राईम विभागाकडून होत असलेल्या पडताळणीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शिक्षक भरती प्रक्रियेत अशा प्रकरणांची स्वतंत्र छाननी करण्याची भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाने घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे यंदाच्या भरतीतील १३ उमेदवारांच्या बाबतीत सायबर विभागाच्या अहवालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पुढील आठवड्यात समुपदेशनाची प्रक्रिया होण्याची शक्यता असून, त्याबाबत उमेदवारांना ई-मेलद्वारे सूचना देण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे एका बाजूला १३ संशयित उमेदवारांच्या पडताळणीचा अहवाल आणि दुसऱ्या बाजूला ४५७ उमेदवारांच्या समुपदेशनाची प्रतीक्षा, अशा दुहेरी टप्प्यावर रत्नागिरीतील शिक्षक भरती प्रक्रिया पोहोचली आहे.
सायबरच्या अहवालाची प्रतीक्षा
२०१८-१९ मधील टीईटी घोटाळ्यात बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे पात्र ठरल्याचा संशय असलेल्या १३ उमेदवारांनी यंदाच्या शिक्षक भरतीसाठी अर्ज केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. संबंधित उमेदवारांची नावे, टीईटी क्रमांक आणि आधारशी संबंधित तपशील पुणे सायबर क्राईम विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. सायबरच्या पडताळणीत संबंधित उमेदवार अपात्र ठरल्यास त्यांना भरती प्रक्रियेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. हा अहवाल दोन ते तीन दिवसांत अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.
४५७ उमेदवारांचे समुपदेशन रखडले
दरम्यान, ४७८ जागांसाठी ४५७ उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली असली तरी समुपदेशनाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. पडताळणीला सुमारे दहा दिवस उलटूनही समुपदेशन न झाल्याने नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दुसरीकडे शिक्षकांची पदे रिक्त असल्याने संबंधित शाळांमधील अध्यापन व्यवस्थेवरही परिणाम होत असल्याची बाब समोर येत आहे.


