(सांगली /तासगाव)
तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला दुचाकीची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात पित्याचा आणि अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृताची पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, चिंचणी येथील रहिवासी आणि सध्या वासुंबे येथे वास्तव्यास असलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बाबुराव जाधव यांचे पुत्र सागर जाधव (वय ३८) हे दुचाकी क्रमांक एमएच १० सीएफ ३८६४ वरून मुलगी हर्षिता हिला सोबत घेऊन तासगाव-मणेराजुरी रस्त्यावरील शाळेत शिक्षिका असलेल्या पत्नी सोनाली जाधव यांना घेण्यासाठी गेले होते.
शाळा सुटल्यानंतर सोनाली जाधव यांना सोबत घेऊन सागर जाधव, हर्षिता आणि सोनाली असे तिघे दुचाकीवरून घरी परतत होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच ०९ सीए ९४७८ क्रमांकाच्या पिकअप वाहनाला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. धडक एवढी तीव्र होती की दुचाकीवरील तिन्ही जण गंभीर जखमी झाले.
या अपघातात सागर जाधव आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी हर्षिता यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सोनाली जाधव या गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी प्रयत्न केले. एकाच कुटुंबातील वडील आणि चिमुकल्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सागर जाधव यांच्या घरापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शाळेत त्यांच्या पत्नी कार्यरत होत्या. शाळा सुटल्यानंतर पत्नीला घरी घेऊन येण्यासाठी सागर जाधव आपल्या चिमुकल्या मुलीला सोबत घेऊन गेले होते. पत्नीला घेऊन घराच्या दिशेने परतत असताना घरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरच हा दुर्दैवी अपघात झाला आणि त्यात सागर जाधव व हर्षिता यांचा मृत्यू झाला.


