(पुणे)
शिवसेना ठाकरे गटात फुट पडणार असल्याच्या चर्चांना वेग आला असतानाच युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “आमचे सर्व खासदार आमच्यासोबत आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका,” असं स्पष्ट सांगत त्यांनी पक्ष फुटीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
रविवारी (१४ जून) शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला ९ पैकी केवळ ४ खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. उर्वरित ५ खासदार ऑनलाइन सहभागी झाल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर ठाकरे गटातील काही खासदार वेगळा गट स्थापन करू शकतात, अशा चर्चाही रंगल्या.
“ऑनलाइन उपस्थित राहणं चुकीचं आहे का?”
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “लोक अंधभक्त असतात, पण आम्ही आमच्या सहकाऱ्यांवर अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत. २०२४ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे प्रत्येक मतदारसंघात गेले. आम्ही, शरद पवार आणि महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी प्रचार करून हे खासदार मशालीच्या चिन्हावर निवडून आणले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “कालच्या बैठकीत सर्वजण उपस्थित होते. काही प्रत्यक्ष तर काही ऑनलाइन सहभागी झाले होते. लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलं आहे आणि त्यामुळे हे सर्व आमच्यासोबत आहेत.” काही खासदार ऑनलाइन सहभागी झाल्यामुळे त्यांच्या मनात संभ्रम आहे का, असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, “ऑनलाइन येणं चुकीचं आहे का? ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत काल माझं बोलणं झालं होतं. रात्री झालेल्या जिल्हाप्रमुखांच्या झूम बैठकीतही ते उपस्थित होते.”
“ऑपरेशन टायगर”च्या दाव्यावर पलटवार
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने यांनी ठाकरे गटातील सात खासदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. पावसाळी अधिवेशनानंतर “ऑपरेशन टायगर” पूर्ण होईल, असंही त्यांनी म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “कृपाल तुमाने यांना सांगा, परत निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा. ते कसे जिंकले, आम्ही कसा प्रचार केला, यात आम्हाला जायचं नाही.”
भाजपवर गंभीर आरोप
आदित्य ठाकरे यांनी भाजपवरही निशाणा साधला. “देशभरात पक्ष फोडण्याचं राजकारण सुरू आहे. दोन तृतीयांश बहुमत मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण त्यानंतर देशात काय होणार? प्रेस फ्रीडम आणि लोकशाही कुठे उभी आहे, हा मोठा प्रश्न आहे,” असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी महागाई, NEET पेपरफुटी आणि जनतेच्या प्रश्नांवरही भाष्य केलं. “जर आपण फक्त राजकीय चर्चांमध्ये अडकलो आणि लोकांच्या आयुष्याशी संबंधित मुद्द्यांवर बोललो नाही, तर जनता आम्हाला निर्लज्ज समजेल,” असा टोला त्यांनी लगावला.

