(ठाणे / वृत्तसंस्था)
डोंबिवलीत चार वर्षांच्या चिमुरडीवर ८५ वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, तो पीडित मुलीच्या घराच्या शेजारी राहत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षांची चिमुरडी घरासमोर खेळत असताना आरोपीने तिला आपल्या घरात बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यासोबत अयोग्य प्रकार घडल्याचे आईच्या लक्षात आले. आईने तत्काळ मुलीची सुटका करून तिला घेऊन रामनगर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ८५ वर्षीय आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७५ (२) आणि पोक्सो कायदा कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, प्रकरणातील सर्व बाबींचा तपास करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबाची ओळख गोपनीय राहावी यासाठी पोलिसांकडून संबंधित व्यक्तींचे जबाब अत्यंत गोपनीय पद्धतीने नोंदवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची प्रतिक्रिया उमटली आहे.


