(चिपळूण / वार्ताहर)
चिपळूण सायकलिंग क्लबचा वर्धापन दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमात वर्षभरात क्लबने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. सायकलिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सदस्यांसह शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत पाल्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
वार्षिक स्नेहसंमेलनादरम्यान चिपळूण सायकलिंग क्लबच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी प्रशांत दाभोळकर यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी मनोज भाटवडेकर, प्रसाद आलेकर आणि सौ. निशा आंबेकर, सचिवपदी प्रा. सौ. भारती तारे, सहसचिवपदी स्वप्निल गायकवाड, खजिनदारपदी योगेश ओसवाल यांची निवड झाली. सदस्य म्हणून विक्रांत आलेकर आणि डॉ. सौ. मनीषा वाघमारे यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. उपस्थित सदस्यांनी नूतन कार्यकारिणीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
कार्यक्रमात क्लबचा वार्षिक अहवाल तसेच आर्थिक अहवाल सादर करण्यात आला. मागील वर्षभरात सायकलिंग क्षेत्रात विविध स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २० सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच वर्षभरात सर्वाधिक सायकलिंग अंतर पूर्ण करणाऱ्या महिला आणि पुरुष गटातील पहिल्या पाच सदस्यांचाही सन्मान करण्यात आला.
क्लबच्या विविध उपक्रमांना सातत्याने दिशा देणारे ज्येष्ठ सायकलपटू श्रीराम दांडेकर यांना ‘Influencer Award’ प्रदान करून गौरविण्यात आले. सायकलिंग क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची यावेळी विशेष दखल घेण्यात आली. क्लबचा युवा सदस्य राघव खर्चे याने पुढाकार घेऊन चिपळूण सायकलिंग क्लबची वेबसाईट विकसित केल्याबद्दल त्याला ‘Certificate of Appreciation’ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
मागील वर्षात क्लबचे सदस्यत्व स्वीकारून नियमितपणे सायकलिंग करणाऱ्या महिला आणि पुरुष गटातील नवोदित सायकलपटूंचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सायकलिंगची आवड जोपासत नियमितपणे सायकलिंग करणाऱ्या नव्या सदस्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या क्लब सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचाही गौरव करण्यात आला.
ज्योती परांजपे आणि प्रसाद आलेकर यांना ‘सायकल रत्न २०२५’
सायकलिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी तसेच चिपळूण सायकलिंग क्लबसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत ‘सायकल रत्न २०२५’ हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला गटातून सौ. ज्योती परांजपे, तर पुरुष गटातून श्री. प्रसाद आलेकर यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
२२,२२२ किलोमीटर सायकलिंग; प्रशांत दाभोळकर ‘सायकल सम्राट’
मागील वर्षभरात सर्वाधिक सायकलिंग अंतर पूर्ण करणाऱ्या सदस्यांना ‘सायकल सम्राट’ आणि ‘सायकल सम्राज्ञी’ या किताबांनी गौरविण्यात आले. पुरुष गटात वर्षभरात तब्बल २२,२२२ किलोमीटर सायकलिंग करणारे प्रशांत दाभोळकर यांना ‘सायकल सम्राट’ या किताबाने सन्मानित करण्यात आले. महिला गटात १०,२३९ किलोमीटर सायकलिंग करणाऱ्या डॉ. मनीषा वाघमारे यांना ‘सायकल सम्राज्ञी’ म्हणून सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
नूतन अध्यक्ष प्रशांत दाभोळकर यांनी मनोगत व्यक्त करताना चिपळूण सायकलिंग क्लबची उत्तरोत्तर प्रगती साधण्यासोबतच चिपळूण, महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावर सायकलिंगचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. अध्यक्षपदी एकमताने निवड केल्याबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.
यानंतर क्लबसदस्या डॉ. आश्विनी गणपत्ये यांनी उपस्थित सदस्यांसाठी विविध मनोरंजक खेळ आणि फनी गेम्सचे आयोजन केले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरण निर्माण झाले. त्यानंतर स्नेहभोजनाने वार्षिक स्नेहसंमेलनाची आनंददायी सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सौ. भारती तारे यांनी केले, तर उपाध्यक्ष मनोज भाटवडेकर यांनी आभार प्रदर्शन केले. चिपळूण सायकलिंग क्लबच्या या वार्षिक स्नेहसंमेलनामुळे सायकलप्रेमी सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांमधील स्नेहबंध अधिक दृढ झाले. सायकलिंगसोबतच आरोग्य, सामाजिक सहभाग, गुणवंतांचा गौरव आणि सकारात्मक जीवनशैली या क्लबच्या मूल्यांना या कार्यक्रमातून अधिक बळकटी मिळाली.


