(लांजा/ रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गालगतच्या देवधे येथील जंगलमय परिसरात गांजाचे सेवन केल्याच्या आरोपावरून लांजा पोलिसांनी ३५ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचबरोबर कुवे-मावळतवाडी येथे मद्यधुंद अवस्थेत फिरताना आढळलेल्या ३४ वर्षीय व्यक्तीवरही महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही कारवायांमुळे लांजा परिसरातील अमली पदार्थ सेवन आणि अवैध मद्यप्राशनाविरोधात पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगत देवधे शेती शाळेसमोरील घनदाट जंगल परिसरात लांजा पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. झाडी-झुडपांच्या आडोशाला एक तरुण गांजाचे सेवन करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ऋषीजीत यशवंत कांबळे (वय ३५, रा. देवधे, ता. लांजा) असे या प्रकरणातील संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) आणि २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी गुन्हा क्रमांक २४२/२०२६ अशी नोंद आहे. पोलीस शिपाई स्वप्नील अविनाश कदम यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
दरम्यान, लांजा तालुक्यातील कुवे-मावळतवाडी येथे दारूच्या नशेत मद्यधुंद अवस्थेत फिरताना आढळलेल्या एका व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली. रुपेश रमेश नेमण (वय ३४, शिक्षण बी.कॉम., रा. कुवे-मावळतवाडी, ता. लांजा) असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा क्रमांक २४१/२०२६ अशी नोंद आहे. महिला पोलीस शिपाई अस्मिता मानसिंग पाटील यांनी या कारवाईबाबत फिर्याद दिली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.


