(लांजा / प्रतिनिधी)
लांजा तालुक्यातील थंड हवामान आणि निसर्गरम्य सौंदर्याने नटलेले माचाळ हे पर्यटकांचे आकर्षण ठिकाण ठरत असले तरी, काही बेफाम पर्यटकांच्या हुल्लडबाज वर्तनामुळे स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. अशा अनुशासनभंग करणाऱ्या पर्यटकांना वेसण घालण्यासाठी लांजा पोलिसांनी रविवारी विशेष मोहीम राबवत माचाळ परिसरात करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत कागदपत्रे नसलेल्या १९ पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पावसाळा सुरू होताच खोरनिनको येथील मानवनिर्मित धबधबा आणि माचाळच्या थंड हवेसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे गर्दी करतात. मात्र, यातील काहीजण मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड, गैरवर्तन व सार्वजनिक शांतता भंग करत असल्याने ग्रामस्थांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत लांजा पोलिसांनी कठोर पावले उचलली. पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी माचाळ परिसरात पोलीस पथक तैनात करण्यात आले. या पथकाने माचाळकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली. तपासणीदरम्यान अनेक वाहनचालकांकडे वाहन परवाना, विमा, हेल्मेट यांसारखी आवश्यक कागदपत्रे आढळली नाहीत. परिणामी, अशा १९ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती निरीक्षक बगळे यांनी दिली.
लांजा पोलिसांची ही तात्काळ आणि कडक भूमिका कौतुकास्पद ठरत असून, माचाळसारख्या पर्यटनस्थळांची शिस्तबद्धता कायम राखण्यासाठी अशी कारवाई नियमित व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.
….पण दारुड्यांवर कडक कारवाई हवी
याच ठिकाणी काही मद्यप्राशन करणारे, सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड, गोंधळ करणारे आणि स्थानिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारे “दारुडे पर्यटक” येतात, हे चित्र गंभीर आहे. अशा वर्तनामुळे निसर्ग पर्यटनाचा मूळ उद्देशच बिघडतो. स्थानिक ग्रामस्थांना त्रास होतो, सामाजिक वातावरण बिघडते आणि पर्यटन स्थळाची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे, आनंद लुटण्यासाठी येणाऱ्यांना त्रास नको, पण दारुड्यांवर कडक कारवाई हवी, ही भूमिका अत्यंत संतुलित आणि योग्य आहे. पोलिसांनी अशा अनुशासनभंग करणाऱ्यांवर कारवाई करतानाच बाकी पर्यटकांना अडथळा होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.