(लांजा / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे. काजळी नदीच्या पुलाजवळ शुक्रवारी सकाळी काचेने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. वळण आणि उताराच्या रस्त्यावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुलावरील सुरक्षा कठड्याला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रक चालक श्याम सिंग (वय ७४, रा. शुक्रतल, श्रीरामपूर, उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत प्रवास करणारे संदीप (वय ४१) जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (४ सप्टेंबर) सकाळी सुमारे १०.५० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. HR-38-X-0993 क्रमांकाचा काचेने भरलेला ट्रक उत्तराखंडहून गोव्याच्या दिशेने जात होता. अंजणारी घाटातील वळण आणि उताराच्या रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रक भरधाव वेगाने चालविल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. काजळी नदीवरील पुलाजवळ आल्यानंतर ट्रकने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या नवीन पुलाला आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जुन्या पुलाला जोडणाऱ्या सुरक्षा कठड्याला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर चालक श्याम सिंग हे ट्रकमधून खाली फेकले गेले आणि पुलाखाली काजळी नदीच्या पात्रालगत असलेल्या दगडावर पडले. त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर पुलाखाली अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. जखमी संदीप यांना उपचारासाठी लांजा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक मुंबई-गोवा महामार्गाच्या एका लेनवर आल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. क्रेन उपलब्ध होताच ट्रक रस्त्याच्या बाजूला हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. घटनास्थळी हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे कर्मचारी तसेच लांजा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लांजा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
धोकादायक अंजणारी घाटात ठोस उपाययोजनांची गरज
अंजणारी घाटातील वळणे, तीव्र उतार आणि अवजड वाहनांची वाढती वाहतूक लक्षात घेता, या मार्गावर सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी संबंधित महामार्ग यंत्रणा, प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे या ठिकाणाची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. धोकादायक वळणांवर पुरेशा क्षमतेचे सुरक्षा कठडे, दिशादर्शक व सावधानतेचे फलक, वेगमर्यादा दर्शविणारे फलक, रस्त्यावरील रिफ्लेक्टर तसेच रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढविणाऱ्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. अवजड वाहनांचा वेग आणि वाहतुकीचे नियमन करण्यासाठीही प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे आहे.

