(संगमेश्वर / प्रतिनिधी)
गणेशोत्सवाच्या उत्साहात घरातील सजावटीचे काम करत असतानाच विजेचा तीव्र धक्का बसल्याने ३६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील मुरडव-सुतारवाडी येथे घडलेल्या या घटनेने गणेशोत्सवाच्या आनंदावर शोककळा पसरली आहे. सुहास विष्णू केळकर असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास सुहास केळकर हे आपल्या घरी गणपती सजावटीचे काम करत होते. सजावटीसाठी विजेचे आकर्षक तोरण लावत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. विजेचा धक्का लागताच ते खाली कोसळले. घटना लक्षात येताच त्यांचे भाऊ स्वप्निल विष्णू केळकर यांनी तातडीने सुहास यांना वाहनातून आरवली येथील डॉ. भायजे यांच्या दवाखान्यात नेले. प्राथमिक तपासणीनंतर अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने त्यांना तत्काळ वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचवल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता सुहास केळकर यांचा उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घर सजविण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने मुरडव गावासह सुतारवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, उत्सवाच्या आनंदात सहभागी असलेल्या ग्रामस्थांनाही या घटनेने चटका लावला आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी बीएनएसएस कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.


