(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’चा आसमंत दुमदुमून टाकणारा जयघोष, ढोल-ताशांचा कडकडाट आणि बाप्पाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू… अशा भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात जिल्ह्यातील दीड दिवसाच्या १३ हजार ४६ गणरायांना मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. यामध्ये ६ सार्वजनिक, तर १३ हजार ४० घरगुती गणेशमूर्तींचा समावेश होता.
सोमवारी मोठ्या उत्साहात घराघरांत तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपात विराजमान झालेल्या गणरायांच्या विसर्जनासाठी मंगळवारी सकाळपासूनच भाविकांची लगबग सुरू झाली होती. दुपारनंतर विसर्जन मिरवणुकांना वेग आला. सहकुटुंब बाप्पाला निरोप देण्यासाठी बाहेर पडलेल्या भाविकांमुळे शहरासह जिल्ह्यातील विविध विसर्जन घाट, समुद्रकिनारे आणि नदीकाठ दिवसभर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. रत्नागिरी शहरातील भाट्ये, मांडवी, मिऱ्या किनारपट्टीसह ग्रामीण भागातील नदीकाठ आणि विसर्जन घाटांवर ढोल-ताशांचा निनाद, लेझीमचा ठेका, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने वातावरण भारून गेले होते. अनेक ठिकाणी महिलांनी पारंपरिक पद्धतीने गणरायाची आरती करून मोदकांचा नैवेद्य दाखविला. त्यानंतर ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त हाक देत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
दीड दिवसांचा सहवास संपत असल्याने अनेक भाविक भावुक झाले होते. विशेषतः बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत उत्साहाने रमलेल्या बच्चेकंपनीच्या चेहऱ्यावर निरोपाची हुरहूर स्पष्ट दिसत होती. काही ठिकाणी गणरायाच्या विसर्जनावेळी भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि भक्तीभावाच्या या क्षणाने वातावरण अधिकच भावस्पर्शी झाले. विसर्जन सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळावे, यासाठी प्रशासनाने विविध ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. समुद्रकिनारे आणि विसर्जन घाटांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जीवरक्षक तसेच पालिकेचे अग्निशमन दलही सज्ज ठेवण्यात आले होते.
दरम्यान, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अनेक सुजाण नागरिकांनी शाडूच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना प्राधान्य दिले. काही भाविकांनी घरच्या घरी टब किंवा बादलीत गणेशमूर्तींचे विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा जपली. खेड, चिपळूण, दापोली, लांजा, मंडणगड, संगमेश्वर, देवरूख, गुहागर आणि राजापूर तालुक्यांतही दीड दिवसाच्या गणरायांना भक्तिभावाने निरोप देण्यात आला. गावागावांतून उमटणारा बाप्पाच्या जयघोषाचा निनाद, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि विसर्जन मिरवणुकांतील उत्साह यामुळे संपूर्ण जिल्हा गणेशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता. दीड दिवसांचा सहवास संपला असला, तरी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या भाविकांच्या हाकेसोबतच गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा आता पुढील वर्षासाठी सुरू झाली आहे.


