(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना चुकीची अथवा भेसळयुक्त कीटकनाशके पुरवून आर्थिक फटका दिल्याचे गंभीर प्रकरण समोर आले असून, काही कीटकनाशक कंपन्या आणि त्यांच्या अधिकृत विक्रेत्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. औषधांच्या विक्रीदरात मोठी तफावत ठेवून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात आल्याचा आरोपही पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी ९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता कृषी आयुक्त कार्यालय येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस शेतकरी नेते राजू शेट्टी उपस्थित राहणार असून, संबंधित सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी, कोकण विभागीय कृषी सहसंचालक, तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे कृषी अधीक्षक यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय इतर संबंधित कंपन्यांच्या जबाबदार अधिकाऱ्यांनाही बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींवर सविस्तर चर्चा करून दोषी कंपन्यांविरोधात ठोस प्रशासकीय कारवाई आणि नुकसानभरपाईसंदर्भात निर्णय अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. बैठकीस आमदार बाळ माने, आमदार वैभव नाईक यांच्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील आंबा-काजू बागायतदार व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील शेतकरी आधीच हवामानातील अनिश्चितता, रोगराई आणि उत्पादन खर्चवाढ यांसारख्या दुहेरी संकटांचा सामना करत असताना काही कंपन्यांकडून रोखीने खते व कीटकनाशके खरेदी करणाऱ्यांना एमआरपीपेक्षा तब्बल ५० टक्क्यांपर्यंत सवलत देत विक्री केल्याचे प्रकारही समोर आले आहेत. या व्यवहारातून स्थानिक विक्रेते आणि काही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळविल्याचा आरोप होत असून, शेतकऱ्यांची दिशाभूल आणि आर्थिक शोषण झाल्याची भावना बळावत आहे.
सिंजेंटा, बायर, ॲडव्हान्स, युपीएल, लक्ष्मी अँग्रो, जीएमपी, सुमीतोमो, धानुका, नागार्जुना यांसह अनेक कंपन्यांच्या उत्पादनांचा या भागात मोठ्या प्रमाणावर पुरवठा झाल्याचे सांगितले जात असून, या संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.


