(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तरवळ (ता. रत्नागिरी) येथील शांत, मनमिळाऊ आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे संदीप गंगाराम मायंगडे (वय ४७) यांचे ११ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, मायंगडे कुटुंबासह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्वभावाने समंजस, समाजप्रिय आणि JSW कंपनी, जयगड येथे निष्ठेने कार्यरत असलेले संदीप मायंगडे हे सर्वांच्या प्रेमास पात्र ठरले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या दुःखद प्रसंगानंतर अष्टविनायक मित्रमंडळ व कारभारी भावकी मंडळींनी एक प्रगतिशील आणि समाजपरिवर्तन घडवणारा निर्णय घेतला. शासनाच्या परिपत्रकानुसार आणि स्त्रीसमानतेच्या दृष्टीने, मृत व्यक्तीच्या पत्नीवर पारंपरिक विधी जसे की अलंकार उतरवणे, बांगड्या फोडणे किंवा मंगळसूत्र नष्ट करणे यासाठी कोणतीही जबरदस्ती न करता, तिला स्वतःच्या इच्छेनुसार निर्णय घेण्याचा सन्मान देण्यात आला.
मंडळाने ठरवले की, “विधवा ही समाजात दुय्यम दर्जाची व्यक्ती नसून, ती आत्मसन्मानाने व सन्मानाने आयुष्य जगू शकते. पतीच्या आठवणी जपण्यासाठी ती इच्छेनुसार अलंकार वापरू शकते.” हा निर्णय संदीप मायंगडे यांच्या कुटुंबीयांच्या संमतीने, नातेवाईक व समाजातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत घेण्यात आला. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत, समाजात नव्या विचारांची बीजे पेरल्याबद्दल कौतुकाची दाद दिली.
या घटनेमुळे कुणबी समाजात विचारपरिवर्तनाची नवी दिशा निर्माण झाली आहे. पारंपरिक रूढी व अंधश्रद्धांना छेद देत, स्त्रीसमानतेचा आणि सन्मानाचा संदेश देण्यात आला. स्थानिक पातळीवर या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, प्रगत सामाजिक जाणिवेची नवी लाट या निर्णयामुळे उमटल्याचे मत व्यक्त होत आहे. संदीप मायंगडे यांच्या निधनाने दुःखाची छाया दाटली असली, तरी त्यांच्या कुटुंबाने आणि अष्टविनायक मित्रमंडळाने घेतलेला हा संवेदनशील, धाडसी आणि प्रगतिशील निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. हा निर्णय केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित न राहता, समाजातील विचारसरणीत सकारात्मक बदल घडवेल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला.

