(मुंबई / वृत्तसंस्था)
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, देशातील सर्वात मोठे शिपयार्ड दिघी पोर्टवर उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचे मॅरेटाईम बोर्ड आणि माझगाव डॉकयार्ड यांच्यात याबाबत करार झाला आहे. माझगाव शिपयार्डने केंद्र सरकारची परवानगी घेऊन या प्रकल्पासाठी जवळपास 27 हजार कोटी रुपयांची स्ट्रॅटेजिक इनव्हेस्टमेंट करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या शिपयार्डमध्ये वॉर शिप आणि कमर्शियल शिप तयार केली जाणार असून, शिप बिल्डिंग, शिप ब्रेकिंग, शिप रिसायकलिंग आणि शिप रिपेअर अशी कामेही केली जातील. या प्रकल्पामुळे जवळपास 15 हजार लोकांना थेट, तर 75 हजार लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या इंडिया मॅरेटाईम व्हिजनअंतर्गत शिप बिल्डिंग क्षेत्रातील क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील 40 टक्के कॅपेसिटी एकट्या महाराष्ट्रात या शिपयार्डच्या माध्यमातून तयार केली जात आहे. त्यामुळे कोकण आणि महाराष्ट्रासाठी हा प्रचंड मोठा करार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. सर्व परवानग्या घेऊन प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असून, काम सुरू झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


