(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गणेशोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या २२ वर्षीय अथर्व राजेश देसाई याचा खाडीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पोहता येत नसतानाही जांभळीचे बंदर येथील खाडीच्या पाण्यात उतरल्याने आणि त्याचवेळी सुरू असलेल्या ओहोटीच्या वेगवान प्रवाहात तो बुडाल्याचे समोर आले आहे. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेनंतर ग्रामस्थ, नातेवाईक आणि पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. अखेर मंगळवारी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) दोन पथकांनी सघन शोध घेत सायंकाळी साडेचारच्या सुमारास अथर्वचा मृतदेह बाहेर काढला. नुकताच इंजिनिअर झालेल्या अथर्वच्या आकस्मिक निधनाने देसाई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
अथर्व मुंबईत वास्तव्यास होता. गणेशोत्सवानिमित्त तो आपल्या पालकांसोबत संगमेश्वर तालुक्यातील मेढे मांजरे-कळकदेकोंड येथे गावी आला होता. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अथर्व आपल्या मुंबईहून आलेल्या मित्रांसोबत जांभळीचे बंदर येथे गेला. घरातील कोणालाही न सांगता मित्रांचा हा समूह खाडीवर पोहोचला. यावेळी अथर्वसोबत निर्मित मितेश देसाई, यश गणेश देसाई, शुभम गणेश देसाई आणि वेदांत मनीष देसाई हे मित्र होते. सर्वजण पाण्यात उतरले असताना खाडीत ओहोटी सुरू होती. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगवान होता. मित्रांपैकी कोणालाही उत्तम पोहता येत नसल्याचे सांगण्यात आले असून, अथर्वला पोहता येत नव्हते. तरीही त्याने पाण्यात उडी घेतली. काही क्षणांतच तो पाण्याच्या प्रवाहात बुडू लागला. अथर्वला बुडताना पाहून मित्र घाबरले आणि त्यांनी तातडीने वाडीकडे धाव घेत ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी कोणतीही वेळ न दवडता खाडीत उतरून अथर्वचा शोध सुरू केला. मात्र, ओहोटीचा प्रचंड वेग, खाडीची खोली आणि वाढता अंधार यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करूनही अथर्वचा ठावठिकाणा लागला नाही. या घटनेची माहिती मिळताच डिंगणी दूरक्षेत्र आणि संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संगमेश्वरचे पोलिस उपनिरीक्षक गावीत, हेड कॉन्स्टेबल मांढरे, कॉन्स्टेबल म्हस्कर आणि होमगार्ड यांनी ग्रामस्थांच्या मदतीने होड्यांमधून रात्रभर शोधमोहीम राबवली. मात्र, अथर्वचा शोध लागला नाही.
यानंतर जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली. रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी तातडीने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला (NDRF) पाचारण केले. मंगळवारी NDRFच्या दोन पथकांनी जांभळीचे बंदर परिसरातील खाडीत सघन शोधमोहीम हाती घेतली. अखेर सायंकाळी साडेचारच्या सुमारास अथर्वचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.


