(मंडणगड /रत्नागिरी)
वेसवी परिसरात रात्रीच्या अंधारात संशयास्पदरीत्या हालचाली करणाऱ्या एका इसमाला बाणकोट सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस पथकाला पाहताच संबंधित इसमाने घाईघाईने तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही कारवाई १३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११.४० वाजता वेसवी येथील मोरे यांच्या टपरीच्या आडोशाला करण्यात आली.
सोमई परमालिक प्रसाद (वय ४४, मूळ रा. ग्राम देवगह, पोस्ट अरजी, तहसील बासी, जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश; सध्या रा. बाणकोट, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेसवी येथे मोरे यांच्या टपरीच्या आडोशाला अंधारात एक इसम संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने घाईघाईने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव व पत्ता सांगितला. घटनास्थळी थांबण्याचे कारण विचारले असता त्याने समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. सूर्यास्त ते सूर्योदय या कालावधीत स्वतःचे अस्तित्व लपवून कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद स्थितीत अंधारात दबा धरून बसल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणी समीर संपत गावडे (वय २७, पोलीस शिपाई क्रमांक ११०७, नेमणूक-बाणकोट सागरी पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाणकोट सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३/२०२६ दाखल करण्यात आला असून, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १२२(क) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित इसमाच्या हालचाली, घटनास्थळी त्याची उपस्थिती आणि त्याने दिलेल्या माहितीसंदर्भात पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.


