(चिपळूण / वार्ताहर)
डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात नुकतीच जिल्हास्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील ६० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ११, १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुली अशा विविध वयोगटांत सामने घेण्यात आले. जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या खेळाडूंनी दर्जेदार आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळविली. विशेषतः १७ आणि १९ वर्षांखालील गटातील सामने अत्यंत अटीतटीचे आणि रंगतदार ठरले.
१५ वर्षांखालील मुलांच्या गटात विधीत सकपाळ याने विजेतेपद पटकाविले. कुलदीप गोऱ्हारे याने उपविजेतेपद मिळविले, तर चिन्मय चव्हाण याने तृतीय क्रमांक मिळविला.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात अर्णव दळी याने रोमहर्षक सामने जिंकत प्रथम क्रमांक पटकाविला. वेदांत सुर्वे याने द्वितीय, तर अधिराज तावडे याने तृतीय क्रमांक मिळविला. याच वयोगटातील मुलींच्या गटात पायल बोनबोरे हिने विजेतेपद मिळविले. अनिष्का महाडिक उपविजेती ठरली, तर विजयश्री चव्हाण हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. या सामन्यात चिन्मय माजुरकर याने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकाविले. वेदांत सुर्वे याने रौप्यपदक, तर अधिराज तावडे याने कांस्यपदक मिळविले. १९ वर्षांखालील मुलींच्या गटातही चुरशीचे सामने झाले. सुहाना भडवळकर हिने प्रथम क्रमांक मिळविला, तर दीक्षा मोरे हिने द्वितीय आणि धृवी घाणेकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास रत्नागिरी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अजित गालवणकर, प्रशिक्षक राकेश खांडेकर, सोमनाथ सुरवसे, प्रदीप यादव आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजयी खेळाडूंची मालवण, सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या प्रादेशिक टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह आयोजित करण्यात आलेली ही जिल्हास्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धा समाधानकारक ठरल्याची प्रतिक्रिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता चिन्मय माजुरकर याने दिली.


