(राजापूर / प्रतिनिधी)
सागरी महामार्गावर भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने आलेल्या अर्टिगा कारने समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्याची घटना जैतापूर येथील होळी फाटा परिसरात घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी अर्टिगा चालकाविरुद्ध नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रविण गोपीनाथ मोरे हे विरार, मुंबई येथील रविकांत दांडेकर यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या ताब्यातील एमएच ०३ ईएस २००० क्रमांकाच्या वाहनातून जैतापूर मठवाडी येथे सोडून परत सागरी महामार्गाने जात होते. ते १३ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजता जैतापूर येथील होळी फाटा परिसरात आले असता देवगडकडून जैतापूरच्या दिशेने जाणारी एमएच ४६ सीई १११५ क्रमांकाची अर्टिगा कार समोरून आली.
तक्रारीनुसार, या कारचा चालक आशिष अरविंद पारकर (वय ४८, रा. ठाणे, मूळ जैतापूर) याने वाहन भरधाव वेगाने तसेच रस्त्याच्या विरुद्ध बाजूने चालविल्याने त्याचे नियंत्रण सुटून फिर्यादी यांच्या कारला धडक बसली. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
अपघातानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९७/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, ३२४(५) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम १८४ नुसार कारवाई करण्यात आली आहे. भरधाव वेग, बेदरकारपणा आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष यामुळे अपघात घडल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा पुढील तपास नाटे पोलिस करीत आहेत.


