(रत्नागिरी /प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यात सुरू असलेल्या कथित अनधिकृत चिरा-दगड खाणींमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा मुद्दा राज्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नात एका सामाजिक कार्यकर्त्याची पाच हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार खेड पोलिसांकडे करण्यात आली आहे. रविराज चिखले याने राज्यमंत्री योगेश कदम यांचा स्वीय सहाय्यक (पी.ए.) असल्याचे भासवून मंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे आणि संबंधित काम करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी पाच हजार रुपये घेतले; मात्र ना मंत्र्यांची भेट घडवून आणली, ना काम करून दिले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी विद्याधर दत्ताराम साळुंखे (वय ५६) यांनी तक्रार दिली आहे. साळुंखे हे मूळचे चिपळूण तालुक्यातील बोरगाव-साळुंखेवाडी येथील रहिवासी असून, सध्या मुंबईत राहतात. ते तालुका आणि ग्रामपातळीवर सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतात. चिपळूण तालुक्यातील अनधिकृत चिरा-दगड खाणींमुळे शासनाचा महसूल बुडत असून, या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होत असल्याचा मुद्दा त्यांना राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निदर्शनास आणून द्यायचा होता. तक्रारीनुसार, या कामासाठी मंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन रविराज चिखले याने दिले. आपण मंत्री योगेश कदम यांचे पी.ए. असल्याचे त्याने भासविल्याचा आरोप आहे. त्यानंतर १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास खेड येथे साळुंखे यांच्याकडून पाच हजार रुपये रोख घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, पैसे घेतल्यानंतर मंत्र्यांची भेट घडवून आणण्यात आली नाही किंवा सांगितलेले कामही झाले नाही, असे साळुंखे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१८(२), ३१८(४) आणि ३१९(२) अन्वये तसेच तक्रारीत नमूद भारतीय दंड विधानातील कलम ४२० व ४१९ च्या संदर्भासह फसवणुकीची नोंद करण्यात आली आहे. आरोपी रविराज चिखले याचा पूर्ण पत्ता उपलब्ध नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. अनधिकृत खाणींमुळे शासनाचा महसूल बुडत असल्याचा मुद्दा मांडण्यासाठी पुढाकार घेतलेल्या साळुंखे यांचीच फसवणूक झाल्याचा आरोप या तक्रारीतून पुढे आला आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि पुढील तपासातून समोर येणाऱ्या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत.


