(चिपळूण)
शहरातील पाग येथील श्री सुकाई मंदिराचा कलशारोहण व जीर्णोद्धार सोहोळा आणि कलशाची मिरवणूक शोभायात्रा कार्यक्रम मंगळवार दिनांक २९ ते बुधवार दिनांक ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
चिपळूण शहरातील पाग येथील सर्व भक्तगणांची नवसाला पावणारी श्री आई सुकाई हे श्रद्धास्थान आहे. मंदिरामध्ये नित्य पूजा अर्चा तसेच सोमवार व मंगळवार सायंकाळी सर्व भक्तगण मिळून आरती करतात. त्यामध्ये स्त्री वर्ग ही समाविष्ट असतो. नित्य दर्शनासाठी मंदिर सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले असते. या देवीच्या अधिपत्याखाली पाग गोपाळकृष्णवाडी, पाग जोशीआळी, पागमळा तसेच यशोधन नगर पर्यंतचा भाग येतो. पाग विभागातील काही भाग हा श्री देव कालभैरवाच्या सीमेत येतो. पाग विभागातील ग्रामदेवता आई सुकाई देवीचे भव्य देखणे मंदिर आहे. मंदिरामध्ये श्री सुकाई देवी सहदेवता श्री सोळजाई, श्री वाघजाई, श्री काळकाई तसेच श्री शंभू देव यांच्या मूर्ती आहेत. मंदिराचे गाभारे दोन असून दोन्ही गाभाऱ्यांच्या मध्ये असणाऱ्या जागेत समोरच छोटेखानी गणेश मंदिर आहे. तसेच सभा मंडप एकच असून आत गेल्यावर डाव्या बाजूस गाभाऱ्यात श्री सुकाई देवी तसेच बाजूस श्री शंभू देवाची पिंड आहे. तसेच उजव्या बाजूच्या गाभाऱ्यात श्री सोळजाई, श्री वाघजाई, श्री काळकाई या सहदेवतांच्या पाषाणमूर्ती आहेत. देवीच्या वार्षिक उत्सवामध्ये शिमगोत्सव व नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या श्री सुकाई देवी मंदिराचा कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळा आणि कलशाची मिरवणूक शोभा यात्रा कार्यक्रम मंगळवार दिनांक २९ एप्रिल ते बुधवार दिनांक ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहेत.
यानिमित्ताने मंगळवार दिनांक २९ रोजी दुपारी ३.३० वाजता कलश आणणे करता ग्रामदेव जुना कालभैरव मंदिर ते श्री सुकाई मंदिर पर्यंत सवाद्य मिरवणूक. मार्गक्रमण:- श्री जुना कालभैरव मंदिर, शिवाजी चौक, नवीन एसटी स्टँड, पाग पॉवर हाऊस मार्गे श्री सुकाई देवी मंदिर असणार आहे. रात्री ८.३० वाजता श्री सुकाई मंदिरात महाआरती तर रात्री १०.३० वाजता सुगम संगीत मराठी भावगीत व भक्तीगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सनई चौघडा, वादन सकाळी ८.३० ते १०.३० वाजता अभिषेक, होम हवन, प्रासाद वास्तू व धार्मिक विधी, सकाळी १०.३० ते ११.३० वाजता कलशारोहण समर्थ भक्त महेश बुवा दातार यांच्या हस्ते होईल. दुपारी ११.३० ते १.३० वाजता मान्यवर, देणगीदार माहेरवासिनी यांचा सन्मान सोहळा व मनोगते होतील. यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम, वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे चेअरमन प्रशांत यादव, प्रतिष्ठित ग्रामस्थ मधुकर जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ४ वाजता श्री देव सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व किर्तन कीर्तन, कीर्तनकार- ह.भ.प. पप्पू महाराज नाडे (पाटण, जि. सातारा ) मृदुंग मनी- पारस भागडे, विनोद भैरवकर , गायक – सुनील भैरवकर , महेंद्र भैरवकर, प्रमोद भागडे, हरी चांदिवडे हे असतील. तर रात्री १०.३० वाजता ‘लावण्यवती अप्सरा’ हा करमणुकीचा कार्यक्रम होईल. तरी श्री सुकाई देवी मंदिराच्या कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळा आणि कलशाची मिरवणूक शोभायात्रा कार्यक्रमाला चिपळूणवासीयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सुकाई देवी देवस्थान, ग्रामस्थ मंडळ पाग- चिपळूण तर्फे करण्यात आले आहे.