(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
कोकण रेल्वे मार्गावरील असुर्डे बोगद्यात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हॉलिडे ट्रेनच्या धडकेत एका ४१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. रेल्वे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना संबंधित तरुण बोगद्यात रेल्वे ट्रॅकच्या बाजूला बसलेला दिसून आला. त्यानंतर ट्रेन येताच तो धावू लागला. ट्रेन पुढे गेल्यानंतर तो ट्रॅकच्या बाजूला गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. गौरंग कैलास प्रधान (वय ४१, रा. दुधापन्नी, कुरीये, जम्मूधरा, कुरीये, सुंदर, ओडिशा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेमध्ये कार्यरत असलेले संदीप काशिनाथ खेतले हे असुर्डे बोगद्यात नियमित पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना बोगद्यामध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूला गौरंग प्रधान बसलेला दिसला. सकाळी सुमारे ६.१५ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारी हॉलिडे ट्रेन बोगद्यात आली. ट्रेन येताना प्रधान धावू लागला. ट्रेन बोगद्यातून पुढे गेल्यानंतर पेट्रोलिंग करणाऱ्या खेतले यांना प्रधान हा रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जखमी अवस्थेत उपडा पडलेला दिसून आला. घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेतून कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद सावर्डे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २२/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.२५ वाजता कामथे उपजिल्हा रुग्णालयात नोंदविण्यात आली, तर त्याच दिवशी सायंकाळी ६.४४ वाजता पोलिस ठाण्यात दाखल प्रक्रिया करण्यात आली. घटनेची नोंद सावर्डे पोलिसांनी केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


