(संगमेश्वर / प्रतिनिधी)
चंदीगड येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल डॉक्टर्स क्रिकेट लीगमध्ये पार्टनर्स युनायटेड मुंबई संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या विजयात संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील दंतवैद्य डॉ. अभिराज नारकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अंतिम सामन्यात पाच बळी घेत त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडत मुंबई संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
या स्पर्धेदरम्यान डॉ. नारकर यांनी सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत आपल्या गोलंदाजीची छाप पाडली. दोन सामन्यांमध्ये त्यांना ‘बेस्ट बॉलर’ पुरस्काराने गौरविण्यात आले, तर ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराचाही त्यांनी मान मिळवला. विशेषतः अंतिम सामन्यातील त्यांच्या भेदक गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यात मुंबईच्या संघाला मोठी मदत झाली.
व्यवसायाने दंतवैद्य असलेल्या डॉ. अभिराज नारकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच क्रिकेटची आवडही जोपासली आहे. विविध सामन्यांमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्यांनी अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नॅशनल डॉक्टर्स क्रिकेट लीगमध्ये मिळवलेल्या या यशाबद्दल जिल्ह्यातील डॉक्टर, क्रिकेटप्रेमी, मित्रपरिवार आणि स्नेही यांनी डॉ. अभिराज नारकर यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


