(महाड)
महाड औद्योगिक वसाहतीतील दहिवड रस्त्यावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात शालेय विद्यार्थी अमोल महामूनकर (वय १०) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
दहिवड गावातील दीपेश भिकेश कालगुडे (वय २०) हा MH.०६.CT.४११६ क्रमांकाच्या स्कुटीवर अमोलला शाळेत सोडण्यासाठी जात असताना महाडकडून येणाऱ्या MH.०६.Z.२६५८ क्रमांकाच्या रिक्षाशी समोरासमोर धडक झाली. रिक्षा चालकाचे नाव गुलाम हुसेन उमर संगमेश्वरी (वय ७२) असे होते. धक्क्याची तीव्रता इतकी होती की अमोल जागीच ठार झाला, तर दीपेश गंभीर जखमी झाला. दीपेशला प्रथम महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते, परंतु प्रकृती बिघडल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला मुंबईला मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
महाड औद्योगिक वसाहतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताबाबत गुन्हा १७६/२०२५ नोंदवला आहे. गुन्हा भारतीय दंड संहिता २०२३ कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक एस.एस. बोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

