(सांगली / वृत्तसंस्था)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली गणपती पंचायतन संस्थानातील धार्मिक विधी आणि उत्तराधिकारीपदावरून पटवर्धन कुटुंबातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. अभिनेत्री आणि पटवर्धन राजघराण्याच्या राजकन्या भाग्यश्री यांनी गणपती मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन उत्सव मूर्तीची आरती केल्याने हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना डावलून भाग्यश्री यांनी आरती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर विजयसिंह राजे पटवर्धन आणि राणी राजलक्ष्मी पटवर्धन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गणपती पंचायतन संस्थानच्या श्रींचे आगमन झाल्यानंतर दरबार हॉलमध्ये उत्सव मूर्तीच्या प्रतिष्ठापनेपूर्वी धार्मिक विधी सुरू होते. याचवेळी अभिनेत्री भाग्यश्री आपल्या बहिणीसह मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्या आणि त्यांनी आरती केली. प्रतिष्ठापनेसाठी उत्सव मूर्ती दरबार हॉलमध्ये नेण्याच्या प्रक्रियेसाठी नूतन युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांना थांबवून भाग्यश्री यांनी गाभाऱ्यात प्रवेश करून आरती केल्याने मंदिर परिसरात चर्चेला सुरुवात झाली. भाग्यश्री यांनी थेट गाभाऱ्यात प्रवेश केला आणि आरती केली. भाग्यश्री यांना आरती करण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न झाला. मंदिराचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि भाग्यश्री यांच्यात शाब्दिक वाद झाला. पण, आरती करूनच भाग्यश्री या बाहेर पडल्या.
भाग्यश्री यांनी मंदिराच्या नियमांचे उल्लंघन करून काही व्यक्तींना सोबत घेत गाभाऱ्यात प्रवेश केल्याचा आरोप विजयसिंह राजे पटवर्धन यांनी केला आहे. हा प्रकार सांगलीकरांनाही आवडला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, संस्थानच्या गणपती मूर्तीची आरती करण्याचा अधिकार आपल्याला असल्याचा दावा भाग्यश्री यांनी केला आहे. विजयसिंह राजे पटवर्धन यांची प्रकृती ठीक नसल्याने आपण आरती केल्याचेही त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर विजयसिंह राजे पटवर्धन यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आदित्यराजे पटवर्धन हेच संस्थानचे उत्तराधिकारी असल्याचे सांगितले. आपण राजा या नात्याने आदित्य पटवर्धन यांना राजकुमार म्हणून जाहीर केले असून, यापुढे तेच संस्थानचे पुढील राजे असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. युवराजांना थांबवून भाग्यश्री यांनी आरती करणे आणि इतर लोकांना सोबत घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.
भाग्यश्री यांना संस्थानच्या उत्तराधिकारीपदाशी संबंधित अशा प्रकारे हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी भाग्यश्री आणि त्यांचे पती हिमालयन यांच्यासोबत संस्थानच्या मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये, असे आवाहन केले आहे. आदित्यराजे पटवर्धन हेच संस्थानचे उत्तराधिकारी असतील आणि सांगलीकर जनतेने त्यांना साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अभिनेत्री भाग्यश्री या विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या कन्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त त्या सांगलीत आल्या होत्या. चार वर्षांनंतर त्यांनी सांगलीतील या मंदिरात आरती केल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे संस्थानच्या व्यवस्थापकांसोबतही त्यांचा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्याचे युवराज आदित्यराजे पटवर्धन असताना भाग्यश्री यांनी संस्थानच्या श्रींच्या उत्सव मूर्तीची आरती केल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
अभिनेत्री भाग्यश्री म्हणाल्या की, ‘सांगलीला बऱ्याच वर्षांनी येणं झालं. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांची प्रकृती सध्या ठीक नाही. गणेशोत्सवाची ही प्राचीन परंपरा खंडित झाली नाही पाहिजे. परंपरा कायम राहिली पाहिजे म्हणून ३ मुलींपैकी एकाने उपस्थित राहणे गरजेचे होते. म्हणून मी तिथे आरतीसाठी हजर होते.’या मंदिरात मी दर्शन करत करतच मी मोठी झाले. सांगलीचा आणि मंदिराचा कधी विसर पडला नाही. त्यामुळे यावर्षी विचार केला आणि गणेश चतुर्थीला मंदिरात आले’, असे भाग्यश्री म्हणाल्या. विजयसिंहराजे यांनी अधिकृत उत्तराधिकारी म्हणून युवराज आदित्यराजे पटवर्धन यांची नेमणूक केलेली आहे. त्यांना विरोध करून आरती का केली? या प्रश्नावर भाग्यश्री यांनी काहीही उत्तर दिले नाही.
सांगली संस्थानच्या गणपती मंदिराची तसेच धार्मिक परंपरांची जबाबदारी ऐतिहासिक काळापासून पटवर्धन घराण्याकडे आहे. मात्र, गेल्या काही काळापासून संस्थानच्या व्यवस्थापनासह भावी उत्तराधिकारीपदावरून कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. संस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदाची जबाबदारी तसेच परंपरेनुसार चालत आलेल्या धार्मिक विधींचे अधिकार कोणाकडे असावेत, यावरून कुटुंबात दोन गट असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगाचा संदर्भ देताना विजयसिंहराजे पटवर्धन भावुक झाले. संस्थानमधील हस्तक्षेपाच्या कारणामुळे त्यांना हटवून दोन वर्षांपूर्वी नियमानुसार दत्तक विधान करण्यात आले आणि आदित्य पटवर्धन यांना उत्तराधिकारी घोषित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना विरोध करत आपण मंदिरात श्रींची आरती केली का, याबाबत थेट भाष्य करण्यास भाग्यश्री यांनी नकार दिला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात समोर आलेल्या या प्रकरणामुळे पटवर्धन कुटुंबातील उत्तराधिकारीपदाचा वाद पुन्हा चर्चेत आला असून पुढील काळात या वादाला कोणते वळण मिळते, याकडे सांगलीकरांचे लक्ष लागले आहे.


