(जैतापूर / वार्ताहर)
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत कलाकार तसेच नवोदित विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले येथे गुरुपूजन व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून आंदुर्ले येथे या संगीत सोहळ्याचे आयोजन केले जात आहे.
श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने पखवाज अलंकार श्री. महेश विठ्ठल सावंत यांच्या निवासस्थानी हा संगीत महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. राजाराम शेलार बुवा, श्री. दादा परब तसेच भजनसम्राट भालचंद्र केळूस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी आंदुर्ले गावचे सरपंच अक्षय तेंडोलकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता सामंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, राजापूर आणि जैतापूर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटणपासून बांद्यापर्यंतच्या कुडाळ, सावंतवाडी, मालवण, आचरा, दोडामार्ग आदी भागांतून पखवाजाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सोलो परफॉर्मन्स सादर करून उपस्थित रसिकांची भरभरून दाद मिळवली.
कार्यक्रमाचे आयोजक पखवाज अलंकार श्री. महेश सावंत यांनी उपस्थित मान्यवर, कलाकार, विद्यार्थी तसेच रसिकांचा यथोचित सन्मान केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन राजा सामंत आणि मोरेश्वर सावंत यांनी केले.
गुरुपूजनातून गुरूंच्या ऋणाचे स्मरण आणि संगीत सादरीकरणातून नव्या पिढीतील कलाकारांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव उत्साही आणि अविस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.

