(दापोली / प्रतिनिधी)
तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी ६४ आणि ८५ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. दोन्ही महिलांना अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरून पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली असून, दापोली पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. वृद्ध महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.
सडवे गणेशवाडी येथील ८५ वर्षीय महिला बेपत्ता
पहिली घटना सडवे गणेशवाडी, पोलिस ठाणे कोळबांद्रे, ता. दापोली येथे ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. हरिश्चंद्र भागोजी कावणकर (वय ६२) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांची नातेवाईक गंगाबाई गुणाजी कावणकर (वय ८५) या बेपत्ता झाल्या आहेत. अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्यांना पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी १२ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना फरारे, ता. दापोली येथे ११ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ४.१५ या कालावधीत घडली. प्रविण महादेव चव्हाण (वय ३३, रा. पांगारी तर्फे गोविंदशेतवाडी, ता. दापोली) यांनी याबाबत तक्रार दाखल केली. त्यांची आई द्रौपदी महादेव चव्हाण (वय ६४) या बेपत्ता झाल्या असून, अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्यांना पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणीही १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाच तालुक्यात दोन घटना
अवघ्या अल्पावधीत एकाच तालुक्यात दोन वृद्ध महिला बेपत्ता झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, महिलांचे नेमके कोणी आणि कोणत्या कारणासाठी अपहरण केले, त्या सध्या कुठे आहेत, याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, या दोन्ही प्रकरणांचा स्वतंत्रपणे तपास सुरू असून, बेपत्ता महिलांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या दिशेने तपास करण्यात येत आहे. वृद्ध महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्यांच्या शोधाकडे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


