(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल बाजारपेठेतील पितांबरी कंपनीच्या स्वमालकीच्या जागेत उभारण्यात आलेल्या अद्ययावत ‘पितांबरी शॉपी’चे उद्घाटन जगप्रसिद्ध पितांबरी कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
यावेळी ताम्हाणे पंचायत समिती सदस्या समीक्षा वाफेलकर, पाचल पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये, तळवडेच्या सरपंच गायत्री साळवी, पाचलचे उपसरपंच आत्माराम सुतार, पितांबरी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव पुजारी, राहुल प्रभुदेसाई, मार्केटिंग मॅनेजर प्रदीप प्रभुदेसाई यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी, पाचल पंचक्रोशीतील मान्यवर आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी आपल्या मूळ गाव तळवडे येथील कोठारवाल्यांच्या दुकानाच्या आठवणींना उजाळा दिला. आज पितांबरीची उत्पादने जगातील २८ देशांमध्ये विकली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे, मुलुंड, दापोली आणि आता पाचल येथे कंपनीची स्वमालकीची दुकाने असून, महाराष्ट्रभर फ्रँचायझीच्या माध्यमातूनही अनेक शाखा कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली.
पाचल येथील नव्या शॉपीमध्ये पितांबरी कंपनीची १०० हून अधिक उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यामध्ये विविध खाद्यपदार्थ, अगरबत्ती व पूजासाहित्य, स्वच्छता उत्पादने तसेच कृषीविषयक उत्पादनांचा समावेश आहे. तसेच २८ ते ३० जून या कालावधीत सर्व खरेदीवर विशेष सवलत देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

