(पुणे / वृत्तसंस्था)
मंचर-भीमाशंकर मार्गावरील पोखरी घाटात बुधवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मारुती सुझुकी इको गाडी खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. सुमारे १५० फूट खोल दरीत गाडी कोसळल्याने झालेल्या या दुर्घटनेत चालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार पुरुष प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास सहा प्रवाशांना घेऊन इको गाडी मंचर-भीमाशंकर मार्गाने पोखरी घाटातून जात होती. घाटातील एका तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर गाडी थेट सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळून उलटली. अपघातात चालक आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर गाडीतील अन्य चार पुरुष प्रवासी जखमी झाले. ज्ञानेश्वर गवारी (वय ४१, रा. धागेवाडी, पुणे) आणि कलावती भोजणे (वय ४५, रा. भोजणेवाडी, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. जखमी प्रवाश्यांची नावे समजू शकली नाहीत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी घाटाकडे धाव घेतली. त्यांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला अपघाताची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी दरीत उतरून प्रयत्नपूर्वक जखमी प्रवाशांना बाहेर काढले.
जखमींना प्रथम स्थानिक घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीचा विचार करून पुढील उपचारांसाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


