( रत्नागिरी/प्रतिनिधी )
भारतीय बौद्ध महासभेच्या रत्नागिरी जिल्हा शाखा, मंडणगड तालुका शाखा आणि आंबडवे ग्रामशाखेच्या संयुक्त विद्यमाने सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंत भीमराव आंबेडकर यांचा स्मृतिदिन तसेच अनागरीक धम्मपाल यांची जयंती गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी आंबडवे येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, आंबडवे येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
आयु. विजय जाधव, उपाध्यक्ष तथा संस्कार विभाग प्रमुख, यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, सरचिटणीस एन. बी. कदम, कोषाध्यक्ष प्रदीप जाधव आणि प्रा. दिलीप वासनीक प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वासह अनागरीक धम्मपाल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात येणार असून, पालीभाषा आणि धम्मलिपीच्या महत्त्वाविषयीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभेच्या पाली विभागाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पालीभाषा व धम्मलिपी पखवाडा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ‘तथागत बुद्धांची पाली, हीच होती जनसामान्यांची भाषाबोली’, ‘एकच निर्धार—पालीभाषा, धम्मलिपीचा करू प्रचार-प्रसार’ तसेच ‘पालीभाषा आणि धम्मलिपी शिकवूया, गावोगावी जाऊया’ या घोषवाक्यांच्या माध्यमातून पालीभाषा व धम्मलिपीचा व्यापक प्रसार करण्याचा संकल्प या पखवाड्यात करण्यात येणार आहे.
पालीभाषा आणि धम्मलिपीचा प्रचार-प्रसार गावोगावी पोहोचविण्यासाठी प्रा. दिलीप वासनीक, विजय य. जाधव, अनामिका जाधव, एन. बी. कदम, संजय आयरे, विजय गो. जाधव, संघमित्रा कुरतडकर, जयेश जाधव, विजय कांबळे, प्रदीप जाधव, अरुणकुमार मोरे आणि अशोक जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार विभागाचे सचिव अल्पेश सकपाळ आणि मंडणगड तालुका सरचिटणीस प्रमोद सकपाळ करणार आहेत.
या कार्यक्रमाला अल्पेश सकपाळ, विकास पवार, प्रज्ञाताई कांबळे, शरणपाल कदम, जनार्दन मोहिते, सुनील पवार, विजय कांबळे, तानाजी कांबळे, महेंद्र कदम यांच्यासह तालुका अध्यक्ष सुनील पवार, राहुल मोहिते, सुभाष जाधव, आर. बी. कांबळे, जयरत्न कदम, विद्याधर कदम, अरुणकुमार मोरे, अनिल घाडगे, हर्षद जाधव, सुजाता सकपाळ, सुदर्शन सकपाळ, संगीता सकपाळ, सुदाम सकपाळ, नरेंद्र सकपाळ, उत्तम सकपाळ, आत्माराम सकपाळ, नथुराम सकपाळ आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच संस्थेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, बौद्धाचार्य, श्रामणेर, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, सैनिक तसेच उपासक-उपासिका मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


