( गुहागर / वार्ताहर )
तवसाळ गावचे सुपुत्र आणि हेदवी पंचक्रोशीत यशस्वी इलेक्ट्रिकल व्यावसायिक म्हणून ओळख असलेले सचिन विश्वनाथ सुर्वे यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने तवसाळसह हेदवी पंचक्रोशीत शोककळा पसरली असून, विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त होत आहे.
सचिन सुर्वे हे भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस तसेच गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांचे मोठे बंधू होते. गेल्या सहा वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. हेदवी येथे वास्तव्यास असताना त्यांनी सुरुवातीच्या काळात विकास जोगळेकर यांच्याकडे इलेक्ट्रिकल काम केले. त्यानंतर स्वतःचा इलेक्ट्रिकल व्यवसाय सुरू केला आणि त्यात यश मिळवले. त्यांच्या व्यवसायाची आणि कार्याची ओळख हेदवी पंचक्रोशीत सर्वदूर पोहोचली होती.
व्यवसायासोबतच नाटक, तमाशा, भजन तसेच सार्वजनिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्येही सचिन सुर्वे सक्रिय असत. आपल्या हरहुन्नरी स्वभावामुळे आणि सर्वांशी सलोख्याचे संबंध जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी परिसरात अजातशत्रू म्हणून ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने परिचितांसह परिसरातील नागरिकांकडून दुःख व्यक्त केले जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, काका आणि भाऊ असा परिवार आहे. तवसाळ येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रशांत शिरगावकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, सभापती प्रणव पोळेकर, पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी, संदिप गोरिवले यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.


