( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला हुल्लडबाजीचे स्वरूप देत सार्वजनिक रस्त्यावर चक्क तलवारीने केक कापणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मिरजोळे-पाटीलवाडी परिसरात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवारीचा वापर करून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
हर्षराज सुभाष पाटील (रा. मिरजोळे, पाटीलवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी हर्षराज पाटील याने आपल्या वाढदिवसानिमित्त मिरजोळे येथील पाटीलवाडी परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर तलवारीचा वापर करून केक कापला. वाढदिवसाच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ तयार करण्यात आला आणि तो सोशल मीडियावर, तसेच व्हॉट्सअँपवर प्रसारित झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
रस्त्यावर तलवारीसारख्या शस्त्राचा वापर करून केलेल्या या प्रकारामुळे मानवी जीवितास तसेच इतर नागरिकांच्या वैयक्तिक सुरक्षेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच या कृत्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत कारवाई केली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद बाबल्या कांबळे (वय ३८) यांनी फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून १२ सप्टेंबर रोजी रात्री १०.२५ वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हर्षराज पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता, २०२३ मधील कलम १२५, भारतीय शस्त्र अधिनियमातील कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(१)(३) चा भंग केल्याप्रकरणी कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. विशेषतः रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाकडून कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या प्रकारांवर कठोर भूमिका घेतली जात आहे.
वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचा वापर करून त्याचे प्रदर्शन करण्याचे प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असताना पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये वाढदिवसाच्या नावाखाली रस्त्यावर हुल्लडबाजी, शस्त्रांचे प्रदर्शन आणि दहशत निर्माण करण्याच्या प्रकारांचे लोण आता कोकणातही पोहोचत असल्याचे चित्र अधूनमधून समोर येत आहे. मात्र, रत्नागिरीच्या शांत आणि संयमी सामाजिक वातावरणाला अशा प्रकारची उन्मत्त प्रवृत्ती धक्का देत असेल, तर ती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलिसांच्या कारवाईतून मिळत आहे.


