( रत्नागिरी / वार्ताहर )
भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाने ५९ व्या युवा महोत्सवाच्या दक्षिण रत्नागिरी प्राथमिक फेरीत उल्लेखनीय यश संपादन केले. विविध कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
शैक्षणिक वर्ष २०२६ अंतर्गत ६ ऑगस्ट रोजी लांजा येथील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात ५९ व्या युवा महोत्सवाच्या दक्षिण रत्नागिरी प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात देव-घैसास-कीर महाविद्यालयाच्या एकूण २५ विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पारितोषिके मिळविली. मराठी स्किट स्पर्धेत महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला. मराठी कथाकथन स्पर्धेत कु. प्राची बोंबले हिने द्वितीय क्रमांक, तर कार्टूनिंग स्पर्धेत कु. आदित्य नेवरेकर याने तृतीय क्रमांक मिळविला.
याशिवाय हिंदी वादविवाद स्पर्धेत कु. स्वाराली इंदुलकर व कु. सीमा जांगिड, रांगोळी स्पर्धेत कु. महेश्वरी नांदगावकर तसेच मराठी एकपात्री स्पर्धेत कु. गौरी ओळकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवत आपली कला-कौशल्ये सिद्ध केली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल भारत शिक्षण मंडळाचे पदाधिकारी तसेच संस्थेचे सचिव धनेश रायकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, सांस्कृतिक विभागप्रमुख ऋतुजा भोवड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
युवा महोत्सवातील या यशामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील महाविद्यालयाची कामगिरी अधिक ठळक झाली आहे.

