(संगमेश्वर / वार्ताहर)
गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या ३१ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायले कानालवाडीत येथे घडली. सायले कानालवाडी येथे आज (रविवारी, १३ सप्टेंबर) रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का लागून स्वप्नील श्रीकांत कानाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेशोत्सवानिमित्त स्वप्नील मुंबईहून आपल्या गावी आले होते. घरात सणाचा आनंदाचे वातावरण असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील वीज जोडणीमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक कारण असल्याचे सांगितले जात आहे. स्वप्नील हे मितभाषी, हसतमुख आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. कुटुंबासह वाडीतील प्रत्येकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सायले गावावर शोककळा पसरली आहे.
स्वप्नील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यापैकी एक मुलगी तीन वर्षांची, तर दुसरी अवघी सहा महिन्यांची आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा झालेला मृत्यू अत्यंत हृदयद्रावक ठरला असून, या घटनेने गावकऱ्यांचेही मन हेलावून गेले आहे.
वडिलांच्या मायेचा आधार हरपलेल्या या दोन चिमुकल्या मुलींकडे पाहताना उपस्थितांचेही डोळे पाणावले. एका क्षणात संसाराचा आधार हरपल्याने कुटुंबीयांवर दुःखाचे आभाळ कोसळले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेने सायले गावातील उत्सवाचा आनंदच हिरावून घेतला. स्वप्नीलच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण गाव एकवटले होते. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात हळहळ अशीच परिस्थिती यावेळी पाहायला मिळाली. गणरायाच्या आगमनाच्या आनंदात बुडालेल्या गावावर एका कुटुंबाच्या दुःखाची काळी छाया पसरली आहे. सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सायले कानालवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


