(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे भरधाव शेवरलेट एन्जॉय कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. धडकेनंतर तरुण रस्त्यालगत असलेल्या दगडावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी रत्नागिरीकडे हलविण्यात येत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने वेळवंड परिसरावर शोककळा पसरली आहे.
तेजस विनायक पांचाळ (२४, रा. वेळवंड, रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथील पुलावरून तेजस दुचाकीने वळण घेत असताना मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या शेवरलेट एन्जॉय कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. कारची धडक इतकी तीव्र होती की तेजस दुचाकीवरून दूर फेकला गेला आणि महामार्गालगत असलेल्या दगडावर आदळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडला होता. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने गंभीर जखमी तेजसला उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. मात्र, डोक्याला झालेली गंभीर दुखापत जीवघेणी ठरली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढलेली असतानाच बावनदीतील या अपघाताने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावरील धोकादायक वळणे, वेगावरील नियंत्रणाचा अभाव आणि वाढती वाहतूक यामुळे अपघातांचा धोका कायम असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे. सणासुदीच्या काळात महामार्गावरील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज या निमित्ताने पुन्हा समोर आली आहे.


