(देवळे / प्रकाश चाळके)
देवनगरी देवरूख पर्यटन उपक्रमांतर्गत क्रांती व्यापारी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘सप्तलिंगी दर्शन यात्रा’ या अनोख्या पर्यटन आणि आध्यात्मिक सफरीचा अनुभव देवरूख येथील सखी महिला मंडळाच्या २० सदस्यांनी उत्स्फूर्तपणे घेतला. सप्तलिंगी नदीच्या काठावरील विविध शिवलिंगांचे दर्शन, निसर्गरम्य परिसराची सफर आणि सप्तलिंगी नदीचे मनोहारी दर्शन अशा अध्यात्म, निसर्ग आणि पर्यटनाच्या सुंदर संगमातून ही यात्रा उत्साहात पार पडली.
अखिल भारतातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देऊन अनेक ठिकाणांचा अनुभव घेतल्यानंतरही आपल्या देवरूख परिसरातील अद्भुत निसर्गसौंदर्य आणि पावन धार्मिक स्थळांचा अनुभव घ्यावा, असा निश्चय सखी महिला मंडळाच्या प्रमुख शिला घस्ते यांनी केला. त्यांच्या या संकल्पनेला मंडळाच्या सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यातून २० सदस्यांच्या सहभागाने सप्तलिंगी दर्शन यात्रा आनंदात पार पडली.
यात्रेदरम्यान सहभागी सदस्यांना सप्तलिंगी नदीचे नयनरम्य दर्शन, नदीकाठावरील शिवलिंगे, परिसरातील प्राचीन मंदिरे तसेच या शिवलिंगांचा ज्योतिर्लिंगांशी असलेला धार्मिक आणि आध्यात्मिक संदर्भ याबाबत माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, एका दिवसात तब्बल १२ शिवलिंगांचे दर्शन घेण्याचा योग या यात्रेचे विशेष आकर्षण ठरला.
भारतभरातील विविध निसर्गरम्य आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानंतरही आपल्या देवरूख परिसरातच इतके अद्भुत निसर्गसौंदर्य, आध्यात्मिक ऊर्जा आणि शिवलिंगांचा पावन सहवास अनुभवायला मिळतो, याचा विशेष आनंद असल्याची भावना सहभागी महिला सदस्यांनी व्यक्त केली. ‘सप्तलिंगी दर्शन यात्रा हा अनुभव अत्यंत सुंदर, वेगळा आणि आध्यात्मिक समाधान देणारा आहे,’ अशा प्रतिक्रिया सदस्यांनी दिल्या.
या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश घस्ते आणि संजय सुर्वे यांनी विशेष मेहनत घेतली. क्रांती व्यापारी संघटनेच्या वतीने सहभागी यात्रेकरूंना संपूर्ण प्रवासात निसर्ग, मंदिरे, शिवलिंगे आणि त्यांचे धार्मिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गाईडची व्यवस्था, चहा, नाश्ता आणि जेवणाचे नियोजनही व्यवस्थित करण्यात आले होते.
‘देवनगरी देवरूख पर्यटन’ या संकल्पनेअंतर्गत आपल्या परिसरातील निसर्ग, नदी, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा यांची स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना ओळख करून देण्याचा प्रयत्न क्रांती व्यापारी संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे. त्याचाच महत्त्वपूर्ण भाग असलेली सप्तलिंगी दर्शन यात्रा ही देवरूख परिसराच्या पर्यटन क्षेत्राला नवी ओळख देणारी संकल्पना ठरत आहे. स्थानिकांनी आपल्या परिसरातील अद्भुत पर्यटनस्थळांचा अभिमानाने अनुभव घ्यावा, असा संदेशही या यात्रेतून देण्यात आला.
सप्तलिंगी दर्शन यात्रेसोबतच ‘Explore देवरूख’, जंगल नाईट सफारी, किल्ले महिमतगड ट्रेक, लिंगाचा डोंगर ट्रेक, टिकलेश्वर दर्शन, काशी-रामेश्वर यात्रा अशा विविध ट्रिप्स क्रांती व्यापारी संघटनेच्या वतीने ‘देवनगरी देवरूख पर्यटन’ उपक्रमांतर्गत आयोजित केल्या जातात. जास्तीत जास्त हौशी ग्रुपनी या उपक्रमांचा आनंद घेऊन देवरूख पर्यटनाला चालना द्यावी, असे आवाहन क्रांती व्यापारी संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आले.

