(मुंबई)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी ५ वाजता मुंबईत त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
शपथविधीपूर्वी आज दुपारी सुमारे २ वाजता विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीला पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. गटनेतेपदासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव मांडला, तर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यास अनुमोदन दिले.
विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता त्या पूर्णवेळ राज्याच्या कार्यकारी भूमिकेत कार्यरत राहणार आहेत.
आज सायंकाळी ५ ते ५ वाजून १२ मिनिटांदरम्यान हा शपथविधी सोहळा होणार असून, अतिरिक्त पदभार सांभाळणारे राज्यपाल आचार्य देवव्रत त्यांना मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. विशेष म्हणजे आज केवळ सुनेत्रा पवार यांचाच शपथविधी होणार असून, अन्य कोणत्याही मंत्र्याचा समावेश नाही.
अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ व इतर महत्त्वाची खाती होती. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खाते वगळता इतर खाते सुनेत्रा पवार यांच्याकडेच कायम राहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी त्यांच्याकडेच असेल.
आजच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आणि पक्षाची पुढील दिशा सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

