(लांजा /प्रतिनिधी)
दुचाकीसमोर अचानक गुरे आडवी आल्याने ब्रेक लावताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४१ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तुषार दत्ताराम कुळ्ये (४१, रा. शिरवली पलीकडचीवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. शिरवली-शिरवली फाटा मार्गावर ६ सप्टेंबर रोजी हा अपघात झाला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, तुषार कुळ्ये हे आपला परिचित अनंत गोपाळ कळये (४५, रा. शिरवली पलीकडचीवाडी) यांच्या युनिकॉर्न मोटारसायकलवर मागे बसून प्रवास करीत होते. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.१० वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी शिरवली-शिरवली फाटा मार्गावर खानविलकर यांच्या घरासमोर आली असता अचानक काही गुरे रस्त्यावर आडवी आली. गुरे समोर आल्याचे लक्षात येताच दुचाकीचालक अनंत कळये यांनी तत्काळ ब्रेक लावला. मात्र, या प्रयत्नात दुचाकीवरील दोघांचा तोल गेला आणि मोटारसायकलसह दोघेही रस्त्यावर कोसळले. अपघातात तुषार कुळ्ये गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर प्रसन्न देव राजापकर आणि प्रकाश तकाराम राजापकर यांनी रुग्णवाहिकेतून तुषार कुळ्ये यांना उपचारासाठी रत्नागिरीतील चिराय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय फडके यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या अपघाताबाबत दुचाकीचालक अनंत गोपाळ कळये यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली असून, मोटार अपघात रजिस्टर क्रमांक १२/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, तुषार कुळ्ये यांच्या मृत्यूप्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४७/२०२६ नुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलिसांकडून सुरू आहे.


