(चिपळूण/ रत्नागिरी)
चिपळूण रेल्वे स्थानक परिसरात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला २१३ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी दुचाकी असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून, अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या साखळीचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३९ वाजण्याच्या सुमारास चिपळूण रेल्वे स्थानकाच्या शेजारी आरोपी संकीर्ण राजेश कदम (वय २८, रा. रेहाळभागाडी, ता. चिपळूण) हा दुचाकीसह आढळून आला. त्याच्या हातातील निळ्या रंगाच्या बॅगेत पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गांजा सदृश्य पदार्थ असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तपासणीदरम्यान २१३ ग्रॅम वजनाचा, उग्र वास असलेला, पाने, फुले, काड्या आणि बिया असलेला पदार्थ आढळून आला. हा पदार्थ विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या पदार्थाची किंमत १४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणाच्या तपासात संबंधित पदार्थ आरोपी ऋषिकेश अशोक पवार (वय २९, रा. पागमळा, स्वानंद अपार्टमेंट, बी-विंग, चिपळूण) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती समोर आल्याने त्यालाही अटक करण्यात आली. संकीर्ण कदम याला ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३४ वाजता, तर ऋषिकेश पवार याला त्याच दिवशी सायंकाळी ७.३५ वाजता अटक करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी बजाज पल्सर २२० दुचाकीही जप्त केली असून, तिची किंमत सुमारे ८६ हजार रुपये आहे. त्यामुळे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल वृषाल सगुण शेटकर (वय ४२) यांनी फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक २७७/२०२६ नुसार गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकासारख्या वर्दळीच्या परिसरात अंमली पदार्थाच्या संशयास्पद व्यवहारावर झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध अमली पदार्थांच्या हालचालींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पदार्थाचा नेमका स्रोत, विक्रीचे जाळे आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.


