(चिपळूण /प्रतिनिधी)
औद्योगिक विकासाच्या दृष्टीने राखीव ठेवण्यात आलेल्या एमआयडीसी क्षेत्रातील वाढत्या अतिक्रमणांवर अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. लोटे, खेर्डी, गाणे आणि खडपोली औद्योगिक वसाहतींमध्ये शंभरहून अधिक अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, ४ मे रोजी पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची व्यापक मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून या औद्योगिक पट्ट्यात रस्त्यालगत अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या तसेच मोकळ्या जागांवर पक्की बांधकामे उभी राहत गेली. परिणामी, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे, सुरक्षेचे प्रश्न निर्माण होणे आणि औद्योगिक कामकाजात व्यत्यय येणे, अशा तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत होती. संबंधितांना यापूर्वीही वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या; मात्र, कथित राजकीय पाठबळामुळे कारवाई लांबणीवर पडल्याची चर्चा स्थानिक स्तरावर रंगत होती.
दरम्यान, राज्यभर एमआयडीसी प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली असून, चिपळूण परिसरातील लोटे, खेर्डी व खडपोली औद्योगिक वसाहतींमध्येही आता ती निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एमआयडीसी अधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे बंदोबस्ताची औपचारिक मागणी केली आहे.
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, काहींनी मुदतवाढ देण्याची मागणी पुढे केली आहे. तथापि, प्रशासनाने नियमानुसारच कारवाई होणार असल्याचा ठाम पुनरुच्चार केला आहे. औद्योगिक क्षेत्र अतिक्रमणमुक्त करून ते अधिक सुरक्षित व सुव्यवस्थित करण्याच्या दृष्टीने ही मोहीम कितपत प्रभावी ठरणार, याकडे उद्योग क्षेत्रासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

